घरठाणेमहेश आहेर यांच्या बडतर्फीसाठी मुंब्य्रात राष्ट्रवादीचा मूकमोर्चा, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

महेश आहेर यांच्या बडतर्फीसाठी मुंब्य्रात राष्ट्रवादीचा मूकमोर्चा, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

Subscribe

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची सुपारी देणारे ठाणे महानगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक महेश आहेर यांना महापालिकेच्या सेवेतून बडतर्फ करावे तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी मुंब्रा येथे मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो मुंब्रावासीय सहभागी झाले होते.

गेल्या आठवड्यात महेश आहेर यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये महेश आहेर हे डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना ठार मारण्यासाठी आपण शूटर तैनात केले असल्याचे सांगत आहेत. या ऑडिओ क्लिपमुळे आव्हाड यांच्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात तक्रार दाखल करूनही पोलिसांनी कारवाई केली नाही. त्यामुळे मुंब्रा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष आनंद परांजपे, सय्यद अली अश्रफ यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा-कळवा विधानसभाध्यक्ष शमीम खान यांच्या नेतृत्वाखाली मुंब्र्यातील दारुल फलाह मस्जीद ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक असा मूकमोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये हजारो स्त्री-पुरुष काळे कपडे परिधान करुन तसेच डोक्याला काळ्या फिती बांधून सहभागी झाले होते.

- Advertisement -

ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे, त्या संभाषणात राष्ट्रवादीचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांची मुलगी, त्यांचे जावई यांच्या हत्येची सुपारी दाऊदचा हस्तक बाबाजी याला देण्यात आली असल्याचे ऐकायला मिळते. यासंदर्भात वर्तक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली असतानाही कारवाई करण्यात आलेली नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आघाडीवर असणाऱ्या पोलिसांकडून महेश आहेरवर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्याचा आक्रोश म्हणून हा मोर्चा काढण्यात आला होता, असे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरक्षा पुरविण्याची घोषणा करून दोन आठवडे उलटले आहेत. मात्र, ही सुरक्षा अद्याप देण्यात आलेली नाही. तसेच, तक्रार करूनही गुन्हा दाखल केला जात नाही. यावरुन ठाणे पोलिसांची हतबलता आणि दुर्बलता दिसून येते, अशी टीका यावेळी शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली. वेळीच कारवाई झाली नाही तर हा मोर्चा उग्रही होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

- Advertisement -

या कथित ऑडिओ क्लिपमुळे डॉ. जितेंद्र आव्हाड यांची कन्या व्यथित झाली आहे. किंबहुना, तिचे सासू-सासरे खूप घाबरले आहेत. त्यामुळे आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करीत आहोत की, त्यांनी तत्काळ नताशा आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण द्यावे. संपूर्ण मुंब्रावासीयांनी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला आहे. त्याकडे पाहून तरी पोलिसांनी महेश आहेर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शमीम खान यांनी केली.

या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे शहर महिलाध्यक्ष सुजाता घाग, माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण, माजी नगरसेवक सिराज डोंगरे, नादिरा यासीन सुर्वे, हफिजा नाईक, शेख जाफर नोमानी, सुलोचना पाटील, रुपाली गोटे, फरजाना शाकिर शेख, आशरिन राऊत, जमीला नासीर खान, युवती अध्यक्ष पल्लवी जगताप, महिला विधानसभाध्यक्ष साबिया मेमन यांच्यासह हजारो महिला-पुरुष सहभागी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -