घरताज्या घडामोडीपार्थची बाजू सावरण्यासाठी अजित पवार, सुप्रिया सुळे आणि 'संकटमोचक' मैदानात

पार्थची बाजू सावरण्यासाठी अजित पवार, सुप्रिया सुळे आणि ‘संकटमोचक’ मैदानात

Subscribe

पार्थ पवार यांनी सुशांत प्रकरणात सीबीआय चौकशी आणि राम मंदिराबाबत व्यक्त केलेल्या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात चांगलेच महाभारत रंगले आहे. शरद पवारांनी माध्यमांसमोर पार्थची अपरिपक्वता काढल्यामुळे वडील अजित पवार चांगलेच नाराज झाले असून त्यांनी आपल्या सुपुत्राची बाजू पवारांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. तर त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आपापल्यापरिने पवारांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले. मात्र या सर्वांमध्ये लक्ष वेधले ते राष्ट्रवादीचे संकटमोचक प्रफुल पटेल यांनी. पार्थवरुन पवार कुटुंबात कलहाची चिन्हे दिसताच पटेल खास दिल्लीहून मुंबईला आले. त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घेऊन दोघांचीही समजूत काढल्याचे समजते.

बुधवारी शरद पवारांनी पार्थ पवार बाबत वक्तव्य केल्यानंतर दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयात सुरु असलेली कॅबिनेटची बैठक सोडून थेट सिल्व्हर ओकवर पोहोचले. पार्थ पवार यांनी राष्ट्रवादीच्या विचारांशी विसंगत अशी भूमिका व्यक्त केल्यामुळे पवारांनी माध्यमासमोरच पार्थला सुनावले होते. पवारांच्या भेटीदरम्यान अजित पवारांनी आपल्या मुलाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. ‘पार्थ लहान आहे, त्याला समजून घ्या. तो हळूहळू तयार होईल, पण त्याला जाहीरपणे असे बोलणे योग्य नाही’, अशी नाराजी अजित पवारांनी पवारांसमोर बोलून दाखविली.

- Advertisement -

पार्थच्या आत्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या प्रकरणावर पडदा टाकण्याचा आटोकाट प्रयत्न केला. बुधवारी झालेल्या गरमागरमी नंतर सुप्रिया सुळे यांनी काल (गुरुवारी) मंत्रालयात अजित पवार यांची भेट घेऊन यासंबंधी चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. ही भेट शासकीय कामासंबंधी असल्याचे सांगितले गेले. तसेच पार्थ पवार यांनी देखील काल संध्याकाळी सिल्व्हर ओक गाठून सुळे यांच्याकडे आपल्या भूमिकांबाबत दिलगिरी व्यक्त केली. तसेच यापुढे भूमिका मांडताना पक्षातील ज्येष्ठांशी एकदा विचारविनिमय कर, असा आपुलकीचा सल्ला देखील सुप्रिया सुळे यांनी पार्थला दिल्याचे कळते.

घरातील सदस्यांव्यतिरीक्त पक्षातील ज्येष्ठ नेते जयंत पाटील, छगन भुजबळ आणि प्रफुल पटेल यांनी देखील पार्थची बाजू शरद पवारांसमोर सावरुन थोरल्या पवारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. तसेच माध्यमांनाही या प्रकरणाचा जास्त उहापोह न करण्याची विनंती केली. या घडामोडीत नेहमीच अजित पवारांच्या पाठी ठामपणे उभे असलेले प्रफुल पटेलही दिसून आले. अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी हातमिळवणी करुन पुन्हा राष्ट्रवादीत येईपर्यंत पटेलांनी अजित पवारांना साथ दिली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -