मुंबई – बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना अटक करण्यासाठी शनिवारी बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते. यानंतर जितेंद्र आव्हाड यांचे चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाले. अजित पवार गटाच्या रुपाली ठोंबरे यांनी व्हायरल चॅट माध्यमांसमोर दाखवले. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्हायरल चॅट आपले नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. आज ते माध्यमांसमोर बोलत होते.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, रुपाली ठोंबरे यांनी व्हायरल चॅट माध्यमांसमोर आणण्यापूर्वी एकदा स्वतः तपासून पाहिले पाहिजे होते. व्हायरल चॅट हे माझे नसल्याचे अनेक पुरावे हे बीड पोलीसांना दिले आहे. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या संबंधी तक्रार दिली आहे. पोलिसांनी ठरवले तर एका दिवसांत ते व्हायरल चॅट तयार करणाऱ्यांना पकडू शकतात, असा दावाही आव्हाडांनी केला.
जितेंद्र आव्हाड यांना धमकीचे मेसेज
जितेंद्र आव्हाड यांना धमकीचेही मेसेज आले आहेत. आता आमदारांना धमकी देण्यापर्यंत मजल गेली आहे. यावरुन लक्षात येते की त्यांना कोणाचाही धाक राहिलेला नाही. सरकार आपलं काहीही करणार नाही, याची खात्री आरोपींना आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. मात्र त्यांना माहित नाही, हा आमदार न घाबरणारा आहे.
व्हायरल चॅट संबंधी जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मी Apple चा फोन वापरतो. व्हायरल चॅटचे स्क्रिनशॉट हे Android फोनचे आहेत. मी कधीही मराठीत टाईप करत नाही. असे अनेक पुरावे हे पोलीसांना दिले आहे. ज्यांनी हे चॅट व्हायरल केले त्यांच्यातील जातीय द्वेष देखील दिसून आला असाहे आव्हाड म्हणाले. दलित आणि मुस्लिांना मोर्चात घेऊन या, किती पैसे लागले तरी दिले जातील, असे त्यामध्ये लिहिले आहे. दलित आणि मुस्लिमांना तुम्ही विकत घेऊ शकता का? असा संतत्प सवाल करत आमदार आव्हाड म्हणाले की, हा Atrocity कायद्यानुसार गुन्हा आहे. चॅट व्हायरल करणाऱ्यांवर पोलीसांनी गुन्हा दाखल केला पाहिजे.
रागातही ‘अजित’ म्हणत नाही…
जितेंद्र आव्हाड यांच्या नावाने व्हायरल झालेल्या चॅटमध्ये Whats App डीपी हा जितेंद्र आव्हाडांचा आहे. त्यावर ते म्हणाले की मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा डीपी लावलेला आहे. आंबेडकर ‘फॅशन नही पॅशन है’. असे अनेक पुरावे पोलिसांना दिले आहे. चॅटमध्ये एका ठिकाणी अजित पवारांचा उल्लेख आहे. त्यावर आमदार आव्हाड म्हणाले की, मी कितीही रागात असलो तरी अजित असं कधीच म्हणणार नाही. मी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. कोणाचा कसा उल्लेख करायचा, कोणाला कसा सन्मान द्यायचा हे आम्हाला माहिती आहे. मी कितीही राग आला तरी अजित पवार म्हणेल, आणि कायम अजित दादा असा उल्लेख करतो. पण कधीही एकेरी ‘अजित’ म्हटलेलो नाही. त्यामुळे रुपाली ठोंबरेंना तो चॅट कोणी पाठवला की त्यांनीच स्वतः तयार केला, याचाही शोध घेतला पाहिजे. खोटं काम करण्साठीही थोडी अक्कल लागते, असा टोलाही त्यांनी लगावला.
मला त्यांच्या वकिलीची चिंता…
जितेंद्र आव्हाड यांनी रुपाली ठोंबरेसह चार जणांविरोधात बीडमध्ये एफआयआर दाखल केला आहे. यावर रुपाली ठोंबरे यांनी आता लढाई कायद्याने लढणार. माझ्यावर 30 हून अधिक केस आहेत, त्यात ही आणखी एक असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांचा राजकीय बुरखा टराटरा फाडते असे म्हटले आहे. त्यावर आमदार आव्हाड म्हणाले की, असे अनेक पाहिले आहेत. मला त्यांची चिंता वाटते. ज्यांना हेही माहीत नाही की, कोणताही मेसेज फॉरवर्ड करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे यापुढे त्यांची वकीली चालणार की नाही, याची मला चिंता आहे.
मस्साजोगमधील सरपंच हा मराठा समाजाचा होता. त्यामुळे यात कुठेही जातीय रंग नाही. मी परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीसाठीही लढत आहे. बीडमधील संतोष साठीही लढत आहे. माणूस मारला जातो, त्याचा जीव एवढा स्वस्त आहे का, असा सवाल आव्हाडांनी केला आहे.
Edited by – Unmesh Khandale