पहाटेच्या शपथविधीवर अखेर शरद पवारांनी मौन सोडलंच! म्हणाले…

आता शरद पवार यांच्या या सूचक वक्तव्यामुळे यावर आता वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत.

sharad pawar

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. पहाटेच्या शपथविधीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची संमती होती, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. परंतू त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रसचे ज्येष्ठ नेते शरद पवार मात्र आतापर्यंत यावर काहीच बोलताना दिसून आले नाही. या प्रकरणावर शरद पवार स्पष्टपणे काहीच बोलत नसल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरु होती. पण अखेर शरद पवार यांनी यावर आपलं मौन सोडलंच.

शरद पवार सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. येत्या २६ फेब्रुवारीला कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक आहे. प्रचारासाठी अवघे तीन दिवस उरल आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार चिंचवड आणि कसबा या दोन्ही मतदारसंघात प्रचारासाठी येणार आहेत. त्यांनी दिवसाची सुरुवात चिंचवड विधानसभेच्या बैठकांनी केली आहे. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी हे सूचक वक्तव्य केलं.

देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवर केलेल्या गौप्यस्फोटावर नुकतंच शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय. “पहाटेच्या शपथविधीमुळे राज्यात जी राष्ट्रपती राजवट लागू होणार होती ती उठली” असं शरद पवार यांनी म्हटलंय. शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. गेली पाच दशके राज्याच्या राजकारणातल्या प्रत्येक घडामोडींच्या केंद्रस्थानी शरद पवार राहिले आहेत. ती घडामोड पवारांच्या पक्षात असो की दुसऱ्या पक्षात…राजकीय वर्तुळात घडणाऱ्या घडामोडी या शरद पवार यांच्या अवतीभवती फिरत असतात. त्यात आता शरद पवार यांच्या या सूचक वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा सिद्ध झालंय. यावर आता वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत.