मंदीरे उघडली, अन् भाजपचा ढोंगी चेहरा चव्हाट्यावर आला; राष्ट्रवादीचं टीकास्त्र

NCP slams BJP over Temple reopen
मंदीरे उघडली, अन् भाजपचा ढोंगी चेहरा चव्हाट्यावर आला; राष्ट्रवादीचं टीकास्त्र

‘कोरोना’ आपत्तीनंतर महाराष्ट्र सावरू लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘महाविकास आघाडी सरकार’ने आजपासून मंदिरे जनतेसाठी खुली केली. मंदिरे खुली होत असताना भाजपचा ढोंगी चेहरा मात्र महाराष्ट्राच्या जनतेसमोर आल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस राज राजापूरकर यांनी केली आहे.

मंदिरे उघडल्यानंतर सकाळीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब मुंबादेवीच्या दर्शनाला गेले. उपमुख्यमंत्री अजित पवार व जयंत पाटील यांनीही सिद्धीविनायकाचे सहकुटुंब दर्शन घेतले. छगन भुजबळ यांनी नाशिक सप्तश्रृंगी गडावर जाऊन दर्शन घेतले. धनंजय मुंडे यांनी परळी वैद्यनाथ येथे दर्शन घेतले. आदिती तटकरे यांनी बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले. रूपाली चाकणकर व दत्तामामा भरणे यांनी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गपणती मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

‘महाविकास आघाडी’चे नेते सकाळपासूनच मंदिरांमध्ये जावून दर्शन घेत होते. अजितदादा पवार तर पहाटे सहा वाजताच मंदिरांमध्ये पोहोचले होते. परंतु भाजपच्या एकाही नेत्याला मंदिरात जायला वेळ मिळाला नाही. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर आशिष शेलार, चित्रा वाघ असा कोणताच नेता सकाळी मंदिरात गेलेला दिसला नाही. ‘दार उघड उद्धवा, दार उघड’ अशा शब्दांत भाजपचे प्रवक्ते आचार्य तुषार भोसले टाहो फोडत होते. गेल्या काही महिन्यांत लोकांची माथी भडकवून हे नेते मंदिरे खुली करण्याची मागणी करीत होते.

नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर मंदीरे खुली झाली. पण या नेत्यांना मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचे सुचले नाही. लोकांमधून या नेत्यांच्या ढोंगीपणाबद्दल टीका सुरू झाली. त्यानंतर दुपारनंतर काही भाजप नेत्यांनी मंदिरात जाण्याचे सोपस्कार पार पाडले. मंदिरात दर्शनासाठी जाण्याची वेळ सकाळची असते. लोकं सकाळी मंदिरात जाऊन दिवसाची सुरूवात करतात. पण जनतेने शाब्दीक मार दिल्यानंतर भाजपचे नेते मात्र दुपारी मंदिरात गेल्याकडे राजापूरकर यांनी लक्ष वेधले आहे.

देव व धर्म हा जनतेच्या आस्थेचा विषय आहे. पण भाजपने तो विषय राजकारणाचा बनवून टाकला आहे. ‘कोरोना’ काळात जनता संकटात असताना भाजप नेते मंदिरे उघडी करण्याची मागणी करीत होते. लोकं मेली तरी चालतील, पण आपले राजकारण टिकले पाहीजे हाच भाजप नेत्यांचा घाणेरडा हेतू होता. मंदिरे उघडल्यानंतर भाजप नेत्यांना देवाची मंदिरे दिसली नाहीत. कारण त्यातून राजकीय फायदा नसल्याने या नेत्यांना मंदिरात जावेसे वाटले नाही. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी भाजपचा हा ढोंगी चेहरा महाराष्ट्राच्या जनतेला पाहायला मिळाला. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. त्यामुळे भाजपचा हा ढोंगी चेहरा जनतेच्या समोर आला आहे.


हेही वाचा : बार उघडले तेव्हा मंदिर का नाही उघडली? मुंबादेवीनं विचारल्यावर काय उत्तर देणार – राम कदम