नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर काही अज्ञातांनी दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या हल्ल्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निषेध करण्यात आला आहे. तर, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी याचा निषेध करत सत्ताधाऱ्यांवर टीकादेखील केली. तसेच, त्यांच्यावर हल्ला करणार्यांना लवकरात लवकर पकडण्यात आले नाही, तर मी स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलन करेन, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. (NCP SP Anil Deshmukh car being attacked by anonymous in Nagpur)
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (18 नोव्हेंबर) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची सांगता सभा उरकून ते तीनखेडा भिष्णुर मार्गाने काटोलकडे निघाले होते. यावेळी अचानक काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ काही लोकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला आणि दगडफेक केली. या जीवघेण्या हल्ल्यात अनिल देशमुख हे जखमी झाल्याचे समोर आले असून त्यांना तत्काळ पुढील उपचारासाठी काटोलच्या रुग्णालयात नेण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. अद्याप हा हल्ला कोणी केला? तसेच यामागे कोणाचे कटकारस्थान आहे? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.
सुप्रिया सुळेंनी दिला इशारा
माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. एका माध्यमाशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, “एका सशक्त लोकशाहीत कोणत्याही नेत्यावर असा हल्ला होणे हे धक्कादायक आहे. या राज्यात नेमकं चाललंय तरी काय राज्यात? असा सवाल माझा माझा राज्यातील सरकारला विचारतेय. याबद्दल पोलिसांनी आणि संबधित व्यक्तींनी उत्तर द्यावे. हे गलिच्छ काम पूर्णपणे लोकशाहीच्या विरोधात आहे,” अशी गंभीर टीका त्यांनी यावेळी केली.
राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. लोकशाहीचे धिंडवडे उडवले जात आहेत. याचे उदाहरण आज निवडणुकीच्या सांगता सभेवरून घरी परतताना राज्याचे माजी गृहमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यातून समोर आले. या… pic.twitter.com/vo8U3uoqoH
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) November 18, 2024
दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अनिल देशमुख यांचा जखमी झालेला एक व्हिडीओ शेअर करत निषेध व्यक्त केला. “राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. लोकशाहीचे धिंडवडे उडवले जात आहेत. याचे उदाहरण आज निवडणुकीच्या सांगता सभेवरून घरी परतताना राज्याचे माजी गृहमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यातून समोर आले. या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे.” असे या ट्वीटमध्ये म्हटले आहे.