जळगाव : एकीकडे बीड, परभणीमध्ये झालेल्या हत्या आणि मारहाणीच्या घटनांमुळे राज्यातील राजकारण तापले असतानाच काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याची घटना घडली होती. यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रामधील कायदा आणि सुव्यवस्थेवर सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. अशामध्ये पोलिसांनी 7 पैकी 4 आरोपींना ताब्यात घेतले असून अद्यापही 3 आरोपी फरार आहेत. यावरून आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी गंभीर आरोप केले आहेत. “त्या ३ फरार आरोपींना स्थानिक नेत्याचे संरक्षण आहे. तसेच त्यांचे पोलिसांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे पोलिस त्यांना जाणीवपूर्वक अटक करण्यास टाळाटाळ करत आहेत.” असे गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी केलेल्या या आरोपांनंतर आता अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. (NCP SP Eknath Khadse on Raksha Khadse daughter case in Jalgaon)
हेही वाचा : Farmer Suicide : प्रगतीशील युवा शेतकऱ्याची सणाच्या दिवशीच आत्महत्या; पाणी मिळत नसल्यामुळे टोकाचा निर्णय
एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना नेते एकनाथ खडसे म्हणाले की, “नातीची छेड काढण्याच्या घटनेला आता 10 दिवस उलटून गेले आहेत. घटना घडल्यानंतर आत्तापर्यंत पोलिसांना फरार आरोपींचा शोध घेता आलेला नाही. 4 जणांना अटक केलेली असून 3 प्रमुख आरोपी अद्यापही फरार आहेत. ते फरार झालेले नसून इकडच्या आकांचे पाठबळ आहे. त्यांच्याच पंखाखाली ते लपले आहेत. त्यांच्या पाठीमागे राजकीय शक्तीच आहे.” असा दावा त्यांनी केला आहे. “पोलीस जाणीवपूर्वक आरोपींना पकडण्यात टाळाटाळ करत आहेत. केंद्रीय मंत्री सत्तेत असल्या तरी राज्याचे गृहखाते राज्याकडे आहे. याठिकाणी गृहखात्याने पूर्ण प्रयत्न करूनदेखील आरोपी मिळत नाहीत, याचा अर्थ असा की, स्थानिक पोलीस अपयशी आहेत.” अशी टीका त्यांनी यावेळी केली.
एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, “सर्व आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. पोलीस आणि त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. राज्यातील चित्र पाहिले तर राजकारणाचे गुन्हेगारीकरण होत आहे की, काय? असे वाटत आहे. पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याचे दिसत आहे,” असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला. दरम्यान, यावेळी ते म्हणाले की, “निवडणुकीच्या काळात सरकारने अनेक आश्वासने दिली. लाडक्या बहीणांना 2100 रुपये तातडीने देणार असल्याचे सांगितले. पण, आता पैसे देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. नुकताच जाहीर झालेला अर्थ संकल्प हा जनतेच्या दृष्टीने हिताचा नाही. शेतकऱ्यांसाठी यामध्ये कोणतीही तरतूदी नाही. शेतकरी कर्ज माफी आणि लाडकी बहीण योजना या निवडणुकीत जिंकून येण्यासाठीच्या योजना होत्या. पण अर्थसंकल्पात 40 हजार रुपयांची तूट आहे. हे जनतेसाठी योग्य नाही.” अशी टीका त्यांनी यावेळी केली.