खोटं बोल पण रेटून बोल ही भाजपची पध्दत; पत्राचाळ प्रकरणी ईडीने शरद पवारांचे नाव घेतलेले नाही : महेश तपासे

पत्राचाळ प्रकरणात चौकशी सुरू आहे, त्यात कुठेही ईडीने शरद पवारांचे नाव घेतले नाही. परंतु, 'खोटं बोल पण रेटून बोल', ही भाजपची पध्दत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटले. शिवसेना खासदार संजय राऊत हे पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहे.

MAHESH TPASE

मुंबई : पत्राचाळ प्रकरणात चौकशी सुरू आहे, त्यात कुठेही ईडीने शरद पवारांचे नाव घेतले नाही. परंतु, ‘खोटं बोल पण रेटून बोल’, ही भाजपची पध्दत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटले. शिवसेना खासदार संजय राऊत हे पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहे. तसेच, या पत्राचाळ घोटाळ्यावरून भाजपाने मागील महाविकास आघाडी सरकारवर आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर आरोप केले. अशातच भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणात शरद पवार यांचा सहभागाची कालबद्ध मर्यादेत चौकशी करण्याची मागणी गृहमंत्र्यांकडे केली आहे. (NCP State Chief Spokesperson Mahesh tapase criticizes BJP leader Atul Bhatkhalkar)

पत्राचाळ प्रकरणी भाजपचे अतुल भातखळकर यांनी शरद पवार यांच्यावर आरोप केला असून या आरोपाला महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “महाविकास आघाडीला ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळाले आहे, ते पचनी पडत नसल्याने अतुल भातखळकर यांनी नवीन बातमी निर्माण केली आहे. मोठमोठ्या नेत्यांवर आरोप करायचे हीच भूमिका भाजपची राहिली आहे. त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. परंतु नेत्याची व पक्षाची बदनामी करण्याचा हेतू असतो”, असे महेश तपासे यांनी म्हटले.

“रोजगार, महागाई, शेतकरी आत्महत्या करत आहेत त्याकडे भाजपचे लक्ष नाही फक्त सनसनाटी निर्माण करण्याकरीता भातखळकर यांचे ट्वीट आहे”, असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.

अतुल भातखळकरांचे पत्र

मराठी माणसाला बेघर करणाऱ्या पत्राचाळीच्या भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये गुरुआशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात यावे, याकरिता तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय राऊत यांनी एक बैठक घेतली. या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यामुळे मराठी माणसाला बेदखल करण्याच्या या कारस्थानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा संजय राऊत आणि शिवसेनेबरोबर काय संबंध होता? याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत करावी, अशी मागणी भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.

यासंदर्भात त्यांनी तत्कालीन गृहनिर्माण सचिवांचे विश्लेषण करणारे पत्र दिलेले आहे. या पत्रावरुन हे स्पष्ट होते की, म्हाडा जरी प्राधिकरण असले तरी म्हाडा अधिकाऱ्यांवर निर्णय घेत असताना बाह्य शक्तींचा दबाव होता आणि त्यामुळे या चौकशीच्या प्रकरणाचे धागेद्वारे हे दूरवर म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपर्यंत जात आहेत.

मराठी माणसाला न्याय देण्याकरता आणि त्यातील खरे सत्य बाहेर येण्याकरता या संदर्भातली एक उच्चस्तरीय कालबद्ध मर्यादेची चौकशी करावी अशी मागणी आमदार भातखळकर यांनी या पत्राद्वारे केली आहे.


हेही वाचा – नाट्य-चित्रपट क्षेत्राच्या गतवैभवासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे