मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला. त्यानंतर आता महायुतीकडून मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा आता राज्याच्या राजकारणात रंगली आहे. अशामध्ये महायुतीच्या नेत्यांकडून विविध मागण्या होत आहेत. शनिवारी (23 नोव्हेंबर) निकालादिवशी शिवसेनेच्या नेत्यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. तर, भाजपने देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर आता रविवारी (24 नोव्हेंबर) पत्रकारांशी सवांद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनीदेखील सूचक विधान केले आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे म्हणाले की, “अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण प्रदेशाध्यक्ष म्हणून मी एक गोष्ट नेहमी म्हंटले आहे की, आम्ही वास्तववादी आहोत. आता आम्हाला पक्ष अधिक मजबूत करायचा आहे. सरकारमधला सहभाग हा बहुजनांच्या व्यापक हितासाठी करायचा, हाच अजित पवार यांनी मूलमंत्र लक्ष ठेवून आम्ही काम करत आहोत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या अपेक्षा राहतील, पण या संदर्भातील निर्णय भाजपचे पक्षश्रेष्ठी घेतील.” असे म्हणत मुख्यमंत्री पदावर स्पष्टीकरण दिले आहे.
दरम्यान, शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जास्त जागांवर विजय मिळवल्याचा आनंद व्यक्त करत पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होणार, असे विधान केले होते. त्याआधी राज्यात भाजपला सर्वाधिक जागांवर विजय मिळाल्यानंतर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनीदेखील देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असे वाटत असल्याचे सूचक विधान केले होते. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 132 जागांवर, शिवसेना शिंदे गटाला 57 तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 41 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे महायुतीने तब्बल 230 जागा जिंकल्या. तेच महाविकास आघाडीला फक्त 46 जागांवरच विजय मिळवता आला.