कॅप्टन एकाच ठिकाणी असणं महत्त्वाचं, पवारांकडून मुख्यमंत्र्यांची पाठराखण!

कॅप्टननं एकाच ठिकाणी बसून संपूर्ण टीमवर लक्ष द्यावं, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली.

sharad pawar reaction on maharashtra government performance under the leadership of uddhav thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाहेर जात नाहीत असा आरोप गेले काही दिवस सातत्याने विरोधकांकडून करण्यात येत आहे यावर खासदार शरद पवार यांनी पाठराखण केली आहे. कॅप्टनने एका ठिकाणी बसून सगळ्या टीमवर लक्ष द्यावं, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. आज खासदार शरद पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबादचा दौरा केला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांची पाठराखण करताना शरद पवार म्हणाले, मला लोकांमध्ये जाण्याची आवड आहे. मी लोकांमध्ये रमणारा माणूस आहे. त्यामुळे मी या संकटातही बाहेर जातो. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कुठेही जाण्याची गरज नाही. कॅप्टननं एकाच ठिकाणी बसून संपूर्ण टीमवर लक्ष द्यावं, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली.

ऑगस्ट महिन्यात रुग्णांची संख्या वाढेल असं तज्ज्ञांचं मत आहे. आज बेड्सची संख्या वाढवण्याची गरज आहे. ही एकमेव कमतरता असल्याचं मला दिसत आहे. खासगी डॉक्टरांनादेखील या संकटकाळात सहकार्य करावंच लागेल. त्यांनाही लक्ष द्यावं लागेल. अशा प्रकारची साथ आली तर सर्व डॉक्टरांना मदतीसाठी बोलावण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. तसंच मुख्यमंत्रीही सर्व माहिती घेत असल्याचं पवार म्हणाले.


हे ही वाचा – पोट भरण्यासाठी कसरती करणाऱ्या आजीला गृहमंत्र्यांची १ लाखाची मदत!