घरमहाराष्ट्रही महाराष्ट्राची संस्कृती नाही; सत्तारांच्या शिवीगाळावर सुप्रिया सुळेंची सविस्तर प्रतिक्रिया

ही महाराष्ट्राची संस्कृती नाही; सत्तारांच्या शिवीगाळावर सुप्रिया सुळेंची सविस्तर प्रतिक्रिया

Subscribe

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्तारांच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून सत्तारांविरोधात आंदोलन केले, तर अनेक ठिकाणी सत्तारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत त्यांच्या फोटोंना जोडे मारण्यात आले. दरम्यान या प्रकरणावर भाजपसह अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली. यानंतर अखेर सत्तारांच्या शिवीगाळावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार खुद्द सुप्रिया सुळे यांनीच आपली सविस्तर भूमिका मांडली आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, तसेच अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

सुप्रिया सुळेंनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटले?

महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले,मात्र अशाप्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असे बोलणे-वागणे ही आपली परंपरा नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आपली नाराजी ट्वीटद्वारे व्यक्त केली आहे.

राजकारणात सगळेच तारतम्य पाळतात असे नाही. जरी त्यांनी काही तारतम्य पाळले नाही तरी ज्यापद्धतीने विविध संस्था, व्यक्ती, माध्यमातून याबाबत प्रतिक्रिया आल्या, संवेदना व्यक्त केल्या गेल्या ही बाब आश्वासक आहे. तिची नोंद घेणे गरजेचे आहे असेही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

जर कुणी चुकीचे बोलले असेल, त्यांनी महिलांचा सन्मान जपला नसेल म्हणून आपण अस्वस्थ होणे स्वाभाविक असले तरी आपण या सगळ्या प्रवृत्ती बाजूला टाकूयात आणि महाराष्ट्राची जी सुसंस्कृत परंपरा आहे, ती जतन करुया असे आवाहनही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केले आहे.

राज्यातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी, जाणकारांनी समंजसपणाची भूमिका दाखवून महाराष्ट्र हा ‘सुसंस्कृतच महाराष्ट्र’ आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केले याबद्दल खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली आहे.


हेही वाचा : अरे, मी दहशतवादी किंवा भ्रष्ट असेल तर मला अटक करा; केजरीवालांचा भाजपावर हल्लाबोल


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -