मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले असून या आरोपपत्रामध्ये 14 जणांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांना दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील नेत्यांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती आता समोर आलेली आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते प्राजक्ता तनपुरे आणि त्यांच्यासह प्रसाद तनपुरे, अरविंद खोतकर, सुभाष देशमुख यांची नावे यामध्ये असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. तसेच, काँग्रेस नेते रणजीत देशमुख यांच्याही नावाचा या आरोपपत्रामध्ये समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. (NCP ‘these’ leaders named in chargesheet in Maharashtra State Co-operative Bank embezzlement case)
हेही वाचा – INDIA आघाडीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष, समन्वयक पदाबाबत होणार निर्णय
ईडीकडून या आठवड्यामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले. यामध्ये प्रसाद तनपुरे, सुभाष देशमुख, रणजीत देशमुख, प्रसाद सागर आणि अन्य काही लोकांची नावे असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात एप्रिल महिन्यात ज्यावेळी आरोपपत्र दाखल करण्यात आलेले होते, त्यावेळी अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे देखील नाव असल्याची माहिती देण्यात आलेली होती. परंतु आता नव्याने दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्रांमधून अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे नाव वगळण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता या प्रकरणात ईडीकडून कोणतीही माहिती देण्यास नकार देण्यात आला असला तरी कोणाचाही या प्रकरणात सहभाग आढळल्यास आरोपपत्र दाखल करता येऊ शकते, असे सांगण्यात आलेले आहे.
तर जरंडेश्वर साखर कारखान्याप्रकरणी ईडीने याआधी 65 कोटींच्या मालमत्तेवर जप्ती आणली होती. परंतु या प्रकरणातून अजित पवार यांचे नाव ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी वगळण्यात आले. तर सावनेर येथील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची विक्री किंमत 26 कोटी 32 लाख रुपये असताना सदर कारखाना 12 कोटी 95 लाखात प्रसाद शुगर अँड अलाईड ऍग्रो प्रोडक्ट्स लिमिटेडला विकण्यात आला. त्यामुळे या प्रकरणात ईडीकडून तपास करण्यात आल्यानंतर ईडीने काँग्रेस नेते रणजित देशमुखांसह इतरांचे आरोपपत्रात नाव टाकले आहे. त्यामुळे दोन्ही प्रकरणे सारखी असताना सोबत आलेल्यांना एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे मुंबईमध्ये इंडिया आघाडीची बैठक पार पडण्यापूर्वी बुधवारी (ता. 30 ऑगस्ट) महाविकास आघाडीने पत्रकार परिषद आयोजित केलेली होती. या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना थेट आव्हानच केलेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ राज्य सहकारी बँक घोटाळा, जलसंपदा घोटाळा असे राष्ट्रवादीवर आरोप करून थांबू नये, तर सखोल चौकशी करून त्याची माहिती देशाला द्यावी, असे म्हटले होते. त्यानंतर काल (ता. 31 ऑगस्ट) भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सखोल चौकशी करण्यात आल्यानंतर तुम्ही रडू नका, असा पलटवार केला होता. ज्या नंतर आता या प्रकरणांमध्ये ईडीकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या नावांचा समावेश करण्यात आल्याने विविध चर्चांना उधाण आलेले आहे.