मुंबई : कांद्यावरील निर्यातशुल्क 40 टक्के करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. शेतकऱ्यांची बाजू घेत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरली आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यामुळे कांदा शुल्कवाढ प्रश्नावर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असे चित्र दिसत आहे. तथापि, फडणवीस यांनी, थेट केंद्र सरकारशी संपर्क साधून 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात येत असल्याची घोषणा करत बाजी मारली आहे.
प्रमुख राज्यांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कांदे दरवाढीचा फटका बसू नये तसेच देशांतर्गत बाजारपेठेत पुरवठा वाढवण्याच्या दृष्टीने केंद्राने शनिवारपासून कांद्याच्या निर्यातीवरील शुल्क 40 टक्के केले आहे. हे शुल्क 31 डिसेंबर 2023पर्यंत लागू राहणार असल्याने त्याचा थेट फटका कांदा उत्पादक शेतकर्यांना बसणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाला जोरदार विरोध होत असून नाशिक जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांमधील कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी (21 ऑगस्ट) घेण्यात आला आहे.
हेही वाचा – कांदा निर्यात शुल्क वाढीचा तुघलकी निर्णय केंद्र सरकारने मागे घ्यावा, खासदार अमोल कोल्हेंची मागणी
कांदाप्रश्नी आज शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले. पुण्याच्या आळेफाट्यावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे सहभागी झाले होते. कांदा निर्यातशुल्कात वाढ करणारा केंद्र सरकारचा निर्णय दिशाभूल करणार आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांकडून कांदा 4 हजार रुपये प्रतिक्विंटल भावाने खरेदी करावा, तसेच हा तुघलकी निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना राजधानी दिल्लीमध्ये राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कांदा प्रश्नी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. केंद्र सरकार नाफेडमार्फत महाराष्ट्रातील दोन लाख मेट्रिक टन कांदा 2 हजार 410 रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी करणार असल्याची घोषणा गोयल यांनी केली.
हेही वाचा – Onion Price : केंद्र सरकार 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार; ‘या’ ठिकाणी उभारणार विशेष खरेदी केंद्र
पण त्याआधीच देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत ही माहिती दिली होती. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर याठिकाणी विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील. तसेच 2 हजार 410 प्रतिक्विंटल या दराने ही खरेदी करण्यात येईल. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे, फडणवीस हे जपानदौऱ्यावर असून एकीकडे मुंडे दिल्लीत चर्चा करत असताना, दुसरीकडे फडणवीस यांनी ही घोषणा केली होती.