नव्या सरकारचे जनतेला लागोपाठ तिसरे गिफ्ट, सुप्रिया सुळेंची टीका

मुंबई : आधीच्या महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देत एकनाथ शिंदे सरकारने धक्के देण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे सरकारवर टीका केली आहे. विविध वस्तूंची दरवाढ करत हे सरकार राज्यातील जनतेला धक्के देत असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

सत्तेची सूत्रे हाती येताच फडवीस सरकारच्या काळातील महत्त्वाकांक्षी असलेल्या आरे कारशेडबाबत नव्या शिंदे सरकारने निर्णय घेऊन महाविकास आघाडी सरकारला पहिला धक्का दिला. मेट्रो कारशेड हे कांजूरमार्गऐवजी आरे येथेच उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा नियोजन समितीच्या तब्बल 567.8 कोटी रुपयांच्या कामाला स्थगिती देण्यात आली. शिवाय, अजित पवार यांच्या विभागाचा 13 हजार 340 कोटींचा निधी तात्पुरता रोखून या सरकारने एकापाठोपाठ एक धक्के देण्यास सुरुवात केली आहे.

महाराष्ट्रात नव्या सरकारने स्थानापन्न होताच जनतेला वीजदरवाढीचे लागोलग तिसरे गिफ्ट देऊन टाकले, अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. यापूर्वी गॅसच्या दरात 50 रुपयांची वाढ आणि त्यानंतर दुग्धजन्य पदार्थ व अन्नधान्यांवर जीएसटी हे दोन गिफ्ट या सरकारने आधी दिलेच होते, असे ट्वीट त्यांनी केले आहे.

महावितरणने इंधन समायोजन आकारात वाढ केल्याने ग्राहकांना जादा पैसे देऊन वीज खरेदी करावी लागणार आहे. कोळसा आणि इंधनाचे दर वाढल्यानंतर इंधन समायोजन आकारामध्ये महावितरणकडून वाढ करण्यात येत असते. आता महावितरणकडून वीजदरात मोठी वाढ करण्यात आल्याने राज्यातील जनतेला एकप्रकारचा शॉकच बसला आहे.