राष्ट्रवादीच्या रुपाली पाटलांनी शेअर केला ‘हा’ फोटो, विरोधकांची आचारसंहिता भंगच्या कारवाईची मागणी

ncp rupali thombre patil angry after abdul satta offensive statement on supriya sule

पुणे – कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. सकाळपासूनच येथील मतदान प्रक्रियेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे. त्यातच, राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्ता रुपाली ठोंबरे पाटील यांनी मतदान करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे त्यांचा हा फोटो आता वादात येण्याची शक्यता आहे.

मतदान प्रक्रिया पार पडत असताना अनेक नियमांचं पालन केलं जातं. मतदान करायला जाताना मतदान केंद्रावर मोबाईल, कॅमेरा वापरावर निर्बंध असतात. कोणत्याच मतदाराला येथे मोबाईल घेऊन जाता येत नाही. यासाठी मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली असते. मात्र, असे असतानाही राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी मतदान करतानाचा फोटो काढला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

“रुपाली ठोंबरे पाटील या पेशाने वकील आहेत. तसंच, एका पक्षाच्या त्या जबाबदार पदाधिकारी आहेत, त्यामुळे त्यांनीच अशा पद्धतीने चित्रिकरण केल्याने लोकशाहीची हत्या झाली” असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी या फोटोच्या कॉमेंटद्वारे केली आहे. भारतात गुप्त मतदान प्रक्रिया राबवली जाते. जेणेकरून मतदाराने कोणाला मतदान केले आहे याची माहिती इतर कोणालाही कळत नाही. यासाठीच मतदान केंद्रावर मोबाईल, कॅमेरा घेऊन जाण्यास मज्जाव केला जातो. परंतु, असं असतानाही रुपाली ठोंबरे पाटील यांनी फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केल्याने त्यांच्यावर आता टीका होऊ लागली आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी लवकरात लवकर निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणीही कॉमेंटद्वारे केली जात आहे.

दरम्यान, मी अद्याप मतदान केलेलंच नाही. विरोधकांनी जाणीवपूर्वक मला टार्गेट केलं आहे. भाजपाचा उमेदवार हरणार असल्याचं स्पष्ट झाल्याने ते निशाणा साधत आहेत, अशी प्रतिक्रिया रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे. त्या म्हणाल्या की, एका मतदाराने मला हा फोटो पाठवला म्हणून मी तो फेसबूकला ठेवला. मी अद्यापही मतादन केलं नसून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी येऊन हवंतर तपासणी करावी. तसंच, गोपनियतेचा भंग केल्याप्रकरणी मी तुरुंगात जाणार असेन तर भाजपाच्या सर्व भ्रष्ट नेत्यांना घेऊन तुरुंगात जाईन, असंही रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या.

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुपाली ठोंबरे पाटील यांना भांडखोर म्हटलं होतं. ती भांडखोर आहे फार. पोलीस काही बोलू लागले तर ती थेट त्यांच्या अंगावर जाते. तिला आवरावं लागतं”, असं शरद पवार म्हणाले होते.

हेही वाचा – ‘ती भांडखोर आहे…’, रुपाली ठोंबरेंबाबत शरद पवारांचे स्पष्ट वक्तव्य