शिंदे गटाला भाजप किंवा प्रहारमध्ये विलिन व्हावे लागेल – नीलम गोऱ्हे

neelam gorhe

विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी देखील राज्यातील राजकीय नाट्यांवरून शिंदे गटावर टीका केली आहे. त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना कुठल्यातरी गटात जावं लागेल, विलिन व्हावं लागेल. नाहीतर त्यांचा गट मूळ पक्षापासून विलिन झाला नाही तर त्यांना अपात्रतेमधून सुटका मिळणार नाही, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

शिंदे गट बाहेर गैरसमज पसरवत आहे. चिन्ह आणि पक्ष शिंदे गटाकडे जाईल वगैरे वगैरे.. पण शिवसेनेची एक घटना आहे, जी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार बनवली आहे. त्यामुळे विधिमंडळ पक्ष आणि मूळ पक्ष वेगळा आहे. त्यामुळे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना कुठल्यातरी गटात जावं लागेल आणि विलिन व्हावं लागेल, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तम कारभार केला आहे. कोरोनाच्या काळात त्यांच्या कारभाराची प्रशंसा देशाने केली आहे. या काळात त्यांनी सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. निष्ठेबाबत उदाहरण देताना मुख्यमंत्र्यांनी वामनराव महाडिकांचं उदाहरण दिलं, असं नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं.

शिंदे गटाला स्वतंत्र पक्ष स्थापन करायचा असेल तोदेखील पर्याय नाही. कारण एखाद्या पक्षाचं चिन्ह मिळवण्यासाठी विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत सहा टक्के मतं मिळवावी लागतात. शिवसेनेचं चिन्ह मिळवण्यासाठी आम्हाला सहा टक्के मतं मिळवावी लागली. दुसऱ्या पक्षाला जोपर्यंत ही मतं मिळत नाहीत. तोपर्यंत निवडणूक आयोग हे चिन्ह देत नाही, असं गोऱ्हे म्हणाल्या.


हेही वाचा : पक्षादेश न मानल्याने एका खासदाराला बसला होता दणका, शिंदे गटाला बसणार का फटका?