Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश संसद भवनाच्या नव्या इमारतीचे आज उद्घाटन

संसद भवनाच्या नव्या इमारतीचे आज उद्घाटन

Subscribe

उद्घाटन सोहळा २ टप्प्यात, कार्यक्रमाची सुरुवात धार्मिक विधीने

देशाच्या संसद भवनाची नवीन इमारत उद्घाटनासाठी सज्ज असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज रविवारी या वास्तूचे उद्घाटन होईल. हा उद्घाटन सोहळा २ टप्प्यात होईल. कार्यक्रमाची सुरुवात धार्मिक विधीने होईल. त्यानंतर मान्यवर नवीन इमारतीतील लोकसभा आणि राज्यसभा सभागृहाच्या परिसराची पाहणी करतील. त्यानंतर दुपारी कनिष्ठ सभागृहात राष्ट्रगीताने सोहळ्याच्या दुसर्‍या टप्प्याला सुरुवात होईल, असे म्हटले जात आहे. या उद्घाटन सोहळ्यावर विरोधी बाकांवरील २१ पक्षांनी बहिष्कार घातला असला, तरी इतर २५ पक्ष उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार आहेत. यापैकी काही पक्ष एनडीएचा घटकपक्ष नाहीत.

संसदेतील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळील छत्रामध्ये आयोजित केलेल्या विधीने सकाळी ८ वाजता या समारंभाची सुरुवात होईल. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्यासह ज्येष्ठ मंत्री सहभागी होणार असल्याचे समजते. कार्यक्रमाचा पहिला टप्पा साडेनऊच्या सुमारास संपणार आहे. धार्मिक विधीनंतर मान्यवर कनिष्ठ आणि वरिष्ठ सभागृहाच्या परिसराची पाहणी करतील. लोकसभेच्या दालनात सभापतींच्या खुर्चीशेजारी पवित्र ‘सेंगोल’ अर्थात राजदंड स्थापित करण्यात येईल. यावेळी तामिळनाडूचे पुजारी उपस्थित असतील.

- Advertisement -

दुपारनंतर दुसरा टप्पा सुरू होईल. या टप्प्यादरम्यान, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांचे भाषण होईल, ते राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांचा अभिनंदनपर संदेश वाचतील. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा लेखी संदेशही वाचण्यात येणार आहे. या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधान मोदी एक नाणे जारी करतील. यावेळी त्यांचे भाषणही होणार आहे. त्यानंतर महासचिव लोकसभेच्या कामकाजाच्या समारोपासाठी आभार मानतील.

यांनाही उद्घाटनासाठी निमंत्रणे
संसदेच्या नवीन इमारतीचे मुख्य वास्तुविशारद बिमल पटेल आणि इमारत बांधणार्‍या टाटा कंपनीचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनाही नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. त्याचबरोबर अनेक सिनेकलाकार आणि खेळाडूंसह काही दिग्गजांनाही निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत.

- Advertisement -

कडेकोट सुरक्षा व्यवस्था
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन संसद भवनाभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जागोजागी दिल्ली पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सुमारे ७० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासोबत एसीपी दर्जाचे अधिकारी सीसीटीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवून आहेत.

२१ संत चेन्नईहून दिल्लीला रवाना
चेन्नईच्या धर्मपुरम अधिनाम येथील २१ संत उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी व पंतप्रधान मोदींना सुवर्ण राजदंड (सेंगोल) देण्यासाठी चेन्नईहून दिल्लीला रवाना झालेत. या संतांनी पंतप्रधान मोदींना देण्यासाठी एक खास भेटवस्तूही आणली आहे.

विरोधकांना विचारात घेतले नाही – शरद पवार 

देशात नवीन संसद भवन उभारण्याचा निर्णय घेत असताना विरोधकांना विश्वासात घेणे गरजेचे असते, परंतु विरोधकांना यावेळी विश्वासात घेण्यात आले नाही. त्यामुळे विरोधी पक्षांनी उद्घाटन कार्यक्रमाला जाऊ नये, अशी भूमिका घेतली. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे, अशी माहिती शनिवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर २१ विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला आहे. हा बहिष्कार घालण्यामागील कारण शरद पवारांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

यावेळी शरद पवार म्हणाले की, मी गेल्या अनेक वर्षांपासून संसदेचा सदस्य आहे. या वास्तूत आम्ही बसतो. तिथे नवी वास्तू बांधायची, हे आम्ही वर्तमापपत्रात वाचले. असा महत्त्वाचा निर्णय घेताना संसदेच्या सदस्यांना विश्वासात घेण्याची आवश्यकता होती, पण तसे झाले नाही.

संसद भवनाची नवीन वास्तू आता बांधून तयार आहे. संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपतींच्या उपस्थितीने होते, तशी पद्धत आहे. त्यामुळे या वास्तूचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे, अशी आम्हा सर्व विरोधकांची मागणी आहे. ती मागणीदेखील सत्ताधार्‍यांनी मान्य केलेली नाही. भूमिपूजनाचा कार्यक्रम ठरवतानादेखील विरोधकांना विश्वासात घेतले नाही. कार्यक्रमाबाबत साधी चर्चाही केली नाही. त्यामुळे विरोधकांना विश्वासात न घेता सर्व निर्णय घ्यायचे असतील तर आपण संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला जाऊ नये, अशी विरोधकांची भूमिका होती. या भूमिकेला माझाही पाठिंबा आहे, असे शरद पवार यावेळी म्हणाले.

उद्घाटनावर बहिष्कार हा लोकशाहीचा अपमान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संसद भवन हे लोकशाहीचे पवित्र मंदिर आहे. या मंदिरात देशाच्या जनतेला न्याय देणारे कायदे केले जातात. त्यामुळे अशा पवित्र मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कार टाकणे हा लोकशाहीचा अपमान आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी नवी दिल्लीत बोलताना केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी नीती आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीत सहभागी होण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. नव्या संसद भवनाचे उद्घाटन आज, रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या उद्घघाटन समारंभात राष्ट्रपतींना डावलण्यात आल्याच्या निषेधार्थ काँग्रेससह विरोधी पक्षाने आजच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. विरोधकांच्या या कृतीचा शिंदे यांनी तीव्र निषेध केला.

आपल्या देशात विक्रमी वेळेत संसद भवनाची नवी वास्तू उभी राहिली ही देशवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे अशा वास्तूच्या समारंभाला सर्वांनी उपस्थित राहण्याची आवश्यकता होती, पण काही विघ्नसंतोषी लोक असतात. त्यांचा विरोध लोकशाहीला आहे की पंतप्रधान मोदी यांना आहे, असा सवाल करत विरोधकांचा बहिष्कार ही एक प्रकारची पोटदुखी आहे. देशातील जनता सूज्ञ आहे. ही जनता पोटदुखीवर जमालगोटा देऊन विरोधकांची पोटदुखी दूर करेल, असा टोला शिंदे यांनी लगावला.

विरोधकांची बहिष्काराची कृती म्हणजे नावडतीचे मीठ आळणी अशा स्वरूपाची आहे. पंतप्रधान मोदींनी कितीही चांगले काम केले तरी त्याला विरोध करायचा, विरोधात वातावरण तयार करायचे हेच विरोधक करत आले आहेत, अशी टीका शिंदे यांनी केली. यावेळी त्यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी संसदेशी संबंधित केलेल्या उद्घाटनांचा दाखला देत विरोधकांची टीका निराधार असल्याचे सांगितले. तमिळनाडू, मणिपूर, बिहारमध्ये राज्यपालांना न बोलवता उद्घाटने करण्यात आली आहेत, याकडे एकनाथ शिंदे यांनी यावेळी लक्ष वेधले.

- Advertisment -