घरमहाराष्ट्रChief secretary : मंत्रालयाला नव्या मुख्य सचिवांचे वेध; मनोज सौनिक यांचे नाव...

Chief secretary : मंत्रालयाला नव्या मुख्य सचिवांचे वेध; मनोज सौनिक यांचे नाव चर्चेत

Subscribe

मुंबई : राज्याचे मुख्य सचिव (Chief secretary) मनुकुमार श्रीवास्तव हे वयोमानानुसार ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी मुख्य सचिवपदासाठी वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक (Manoj Saunik), सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक (Sujata Saunik) आणि महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर (Nitin Karir) यांची नावे चर्चेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवपदासाठी मनोज सौनिक यांचे नाव निश्चित केल्याचे समजते.

मनोज सौनिक हे ३० एप्रिलला मनू श्रीवास्तव यांच्याकडून मुख्य सचिवपदाचा पदभार स्वीकारतील, अशी माहिती आपलं महानगरला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. १९८७च्या बॅचचे सौनिक दाम्पत्य असून करीर १९८८च्या बॅचचे आहेत. सौनिक मुख्य सचिव झाल्यानंतर करीर यांच्याकडे वित्त विभागाची जबाबदारी येईल. सेवानिवृत्तीनंतर मनुकुमार श्रीवास्तव यांची राज्य सेवा हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होणार आहे.

- Advertisement -

राज्य सरकारकडून शक्यतो सेवाज्येष्ठतेच्या निकषावर मुख्य सचिवांची नियुक्ती केली जाते. या निकषानुसार मुख्य सचिवपदासाठी सुजाता सौनिक या दावेदार ठरतात. सुजाता सौनिक या जून २०२५ मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांची अजून दोन वर्षांची सेवा बाकी असल्याने सरकारकडून मनोज सौनिक यांना संधी दिली जाणार आहे. सौनिक मुख्य सचिव झाल्यास त्यांना ८ महिन्यांचा कालावधी मिळेल. मनोज सौनिक यांचा सेवा कालावधी याच वर्षी डिसेंबरमध्ये संपत आहे. मनोज सौनिक आणि सुजता सौनिक हे दाम्पत्य १९८७ च्या तुकडीचे सनदी अधिकारी आहेत.

१९८८च्या तुकडीचे अपूर्व चंद्रा आणि राजीव जलोटा हे दोघेही केंद्र सरकारच्या सेवेत आहेत. त्यामुळे मुख्य सचिवपदासाठी डॉ. नितीन करीर यांच्याही नावाची चर्चा आहे. डॉ. करीर हे पुढील वर्षी मार्च २०२४ मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे सौनिक यांच्यानंतर म्हणजे नव्या वर्षाच्या सुरुवातीला डॉ. करीर यांना मुख्य सचिवपदासाठी संधी मिळू शकते. पुढील वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुका लक्षात घेता डॉ. करीर यांना मार्च २०२४ नंतर मुख्य सचिवपदासाठी ६ महिने मुदतवाढ मिळू शकते. अर्थात त्यावेळी राज्यात राजकीय अस्थिर परिस्थिती निर्माण झाली नाही तर डॉ. करीर हे मुख्य सचिवपदापर्यंत पोहचू शकतात.

- Advertisement -

नंदकुमार आणि लिमये निवृत्तीच्या उंबरठ्यावर
जलसंधारण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार हे ३१ मे २०२३ रोजी तर गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये हे जून २०२३ अखेर सेवानिवृत्त होणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -