घरताज्या घडामोडीबिबटे जेरबंद करण्यासाठी आता नवी शक्कल!

बिबटे जेरबंद करण्यासाठी आता नवी शक्कल!

Subscribe

मुंबईवरुन बिबट्याच्या मादीचे मूत्र मागवले, मुंबईचे पथक पुन्हा माघारी

नाशिकरोड : दारणा नदी काठच्या गावांत धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाने आता नवी शक्कल लढवली असून, मुंबईवरुन बिबट्याच्या मादीचे मूत्र मागवल्याचे समजते. दरम्यान, मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून आलेले वनविभागाचे पथक पुन्हा माघारी परतल्याने आता नवी क्लुप्ती कितपत प्रभावी ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बाभळेश्वरमोहगाव, चाडेगाव, सामनगाव, चेहेडी, पळसे, शेवगे दारणा, शिंदे गावात रोजच बिबट्याचे दर्शन होत असल्याच्या तक्रारी वनविभागाला प्राप्त होत आहेत. गेल्या आठवड्यात जाखोरीत बिबट्या जेरबंद केला असला तरी माणसांवरील हल्ले सुरुच आहे. त्याचप्रमाणे जनावरे आणि कुत्रेही फस्त केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे बिबट्यांची संख्या अधिक असल्याचे समोर आल्याने वनविभागासमोर आवाहन उभे राहिले आहे. बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पशुवैद्यकीय अधिकारी व पथकाच्या मार्गदर्शनाखाली नाशिकच्या वनविभागाने वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब केला असला तरी त्याचा फारसा फायदा होताना दिसत नाही. अखेर वनविभागाने मुंबई येथून बिबट्याच्या मादीचे मूत्र मागविल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सध्या १९ पिंजरे व बिबट्याच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी २६ कॅमेरे लावले आहेत. त्याचप्रमाणे बिबट्याच्या मादीचे मूत्र पिंजऱ्यांमध्ये व आजूबाजूला टाकल्याने नर बिबट्या आकर्षित होऊन जेरबंद होण्याची शक्यता वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी विवेक भदाणे यांनी व्यक्त केली. दरम्यान, बिबटे जेरबंद करण्यासाठी नाशिकच्या वनविभागाच्या मदतीला आलेले मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पथक दुसऱ्यांदा माघारी गेल्याचे समजते.

- Advertisement -

बिबट्याच्या लाळेचे नमुने हैद्राबादला

परिसरात चार बळी व अनेक हल्ले करणारा बिबट्या एकच आहे की, अनेक याचा अंदाज बांधणे वनविभागाला अद्याप शक्य नसून जाखोरीत पकडलेल्या बिबट्याच्या लाळेचे नमुनेही हैद्राबाद येथे तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे वनविभागाने सांगितले.

Saiprasad Patil
Saiprasad Patilhttps://www.mymahanagar.com/author/sppatil/
गेल्या १३ वर्षांपासून नाशिकमध्ये पत्रकारितेचा अनुभव. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, गुन्हेगारी यासह विविध विषयांवर लिखाण. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील घडामोडींवर लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -