नवी मुंबई इंपिरीया ग्रुपचे साऊजी मंजिरी यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या

नवी मुंबईः बेलापूर सेक्टर १५ येथील इंपिरीया ग्रुपचे साऊजी मंजिरी (वय ६५) यांची नेरूळ सेक्टर ६ येथे भररस्यात गोळ्या घालून खून केल्याची घटना घडली. ही घटना बुधवारी संध्याकाळी साडेपाच ते पावणे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.

बिल्डर साऊजी मंजिरी हे कारने नेरूळ सेक्टर ६ येथे अपना बाजार समोरील रस्त्याने जात होते. दरम्यान मोटार सायकलवरून आलेल्या दोघांनी कार अडवून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. साऊजी जागीच ठार झाले. या घटनेची माहिती कळताच डीसीपी अमित काळे, डीसीपी पानसरे यांच्यासह क्राईम ब्रँचच्या अधिकारी आणि नेरूळ पोलीस ठाण्याचे पीआय यांनी घटनास्थळी पाहणी केली. ही हत्या जमिनीचा व्यवहार, प्राॅप्रटी किंवा इतर फिसकटलेल्या आर्थिक व्यवहारातुन झाल्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे. इंपिरीया ग्रुपचे साऊजी मंजिरी यांच्यासह पाच जण त्यांच्या कंपनीत भागीदार आहेत.

दरम्यान, स्मार्टसिटी म्हणून नावाजल्या जाणार्‍या नवी मुंबई शहराने अनेक पुरस्कार मिळविले आहेत. मात्र वाढत्या गुन्ह्यांचा आलेख पाहता नवी मुंबईच्या सुरक्षेच्या बाबतीत मात्र चिंताजनक स्थिती आहे. सोनसाखळी चोरी, सायबर गुन्हे, बिल्डरांकडून फसवणूक आणि महिलांचा मानसिक छळ व बलात्कार, पॉस्को सारख्या गंभीर गुन्ह्यात मागील वर्षात वाढ झाली आहे. नवी मुंबईचे नवे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी स्वत: याची गेल्या महिन्यात कबुली दिली होती. येत्या काळात पोलीस दलात खांदेपालट करणार असल्याचे सांगत आयुक्त भारंबे यांनी बेशिस्त आणि कामात चालढकल करणार्‍या कर्मचार्‍यांची हयगय केली जाणार नाही, असे स्पष्ट केले होते.

नवी मुंबईत सर्व प्रकारच्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. आगामी कालावधीत यावर नियंत्रण मिळविण्यावर माझा भर राहील. सायबर गुन्हयांसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर सेल सुरू केले जातील. तसेच महिलांविषयक गुन्हे रोखणे व पॉस्कोच्या नियंत्रणासाठी कठोर पावले उचलले जातील. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची नवीन टीम तयार करण्यात येईल, असे आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले होते.