एमपीएससीचा नवा पॅटर्न २०२५ पासून; राज्य लोकसेवा आयोगाची घोषणा

पुण्यातील आंदोलनाची घेतली दखल

मुंबई – महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक पद्धत (नवा पॅटर्न) लागू करण्याच्या निर्णयाची अंलबजावणी सन २०२५ पासून करण्यात येणार असल्याची घोषणा आयोगाने गुरुवारी ट्विट करून केली. या निर्णयानंतर एमपीएससी परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी पुण्यात सुरू केलेले आंदोलन मागे घेतले आहे.

राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा-सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती तसेच उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे, असे आयोगाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

राज्य सेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ पर्यायांऐवजी वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला होता. हा निर्णय जानेवारी २०२५ पासून लागू करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांची होती. या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी जानेवारी महिन्यात पुण्यात आंदोलन छेडले होते. या आंदोलनाची दाखल घेत राज्य मंत्रिमंडळाच्या ३१ जानेवारी २०२३ च्या बैठकीत मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ च्या मुख्य परीक्षेपर्यंत पुढे ढकलावा, अशी विनंती एमपीएससीला करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्र पाठवले होते.

राज्य सेवा मुख्य परीक्षा ही वस्तुनिष्ठ पर्यायांवर आधारित घेतली जाते. या पद्धतीमध्ये बदल करून जुन्या पद्धतीने म्हणजे वर्णनात्मक पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. हा निर्णय लगेच २०२३ पासून लागू केल्यास या परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता असून त्यामुळे वर्णनात्मक पद्धतीने परीक्षेचा निर्णय २०२५ च्या मुख्य परीक्षेपर्यंत पुढे ढकलण्याची आग्रही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांची ही मागणी मान्य करून त्याप्रमाणे वर्णनात्मक परीक्षा पद्धतीचा निर्णय पुढे ढकलावा, अशी विनंती मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रात केली होती.

मात्र मुख्यमंत्र्यांच्या पत्रावरही आयोगाकडून निर्णय होऊन लेखी आदेश निघत नसल्याने विद्यार्थ्यांनी पुण्यात बेमुदत आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला काँग्रेस, राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला होता. या पार्श्वभूमीवर आयोगाने नवी परीक्षा पद्धत जानेवारी २०२५ पासून लागू करण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.

नवीन अभ्यासक्रम रद्द करावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी नव्हती तर त्यांना वेळ पाहिजे होता. विद्यार्थ्यांनी मागणी केली तेव्हाच आम्ही मंत्रिमंडळात निर्णय घेऊन आयोगाला तशी विनंती केली होती. आयोगाने हा निर्णय घेतल्याबद्दल मी त्याचे स्वागत करतो.

-एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री


तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले आहे. आता जोमाने तयारीला लागा. एमपीएससीच्या परीक्षेत तुम्हाला उत्तम यश लाभेल आणि भविष्यात तुम्ही राज्याच्या प्रशासकीय सेवेत भरीव योगदान द्याल याचा मला विश्वास आहे.

-शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

तीन दिवस अत्यंत सविस्तरपणे बाजू मांडल्यानंतर अ‍ॅड. कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादाचा शेवट अत्यंत भावनिकपणे केला. मी ही केस जिंकेन किंवा हरेन, त्यासाठी मी येथे उभा नाही. मी येथे उभा आहे घटनात्मक नैतिकता टिकून राहावी यासाठी, जी आपण देशात 1950 पासून रुजवत आलो आहोत. त्यासाठी मी उभा आहे, असे अ‍ॅड. कपिल सिब्बल म्हणाले.