मुंबईसह या शहरामध्ये पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू, राज्य सरकारची घोषणा

Petroleum companies issue new rates for petrol and diesel
पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, मुंबईतील इंधनाचे दर जाणून घ्या

केंद्र सरकारच्या पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याच्या घोषणेनंतरही मुंबईतील पेट्रोल- डिझेलचे दर कमी झाले नव्हते. यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केल्यानंतर राज्य सरकारने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, अमरावती आणि औरंगाबादमधील दर कमी केल्याचे जाहीर केले आहे. या बाबत ट्विट करण्यात आले आहे.

या शहरात पेट्रोल व डिझेल वरील दर कमी –

पेट्रोल व डिझेल वरील मूल्यवर्धितकर कपातीनंतर दि. २१ मे २०२२ पासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, अमरावती व औरंगाबाद महापालिका हद्दीत पेट्रोलवर प्रतिलिटर ३२ रुपये ९० पैशांऐवजी ३० रुपये ८२ पैसे तर डिझेलवर प्रतिलिटर २२ रुपये ७० पैशांऐवजी २१ रुपये २६ पैसे इतका मूल्यवर्धित कर असेल. केंद्रानं अबकारी करात कपात केल्यान् देशात पेट्रोल साडेनऊ रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे. केंद्रापाठोपाठ केरळ आणि राजस्थाननंही पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी केला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रानेही हा निर्णय घेतला आहे.

देवेंद्र फडणवीसांची टीका –

महाविकास आघाडी सरकारने राणाभीमदेवी थाटात राज्यात इंधनावरील व्हॅट कमी झाल्याची माहिती शासकीय ट्विटर हँडलवरून प्रसारित केली. प्रत्यक्षात ही शुद्ध फसवणूक आहे. महाविकास आघाडी सरकारने दरकपातीचा कोणताच निर्णय घेतला नाही. तर केंद्राच्या निर्णयाचा हा स्वाभाविक परिणाम आहे. महाविकास आघाडी सरकारने लोकांना मुर्ख न बनविता तत्काळ पेट्रोल-डिझेल दरकपातीचा निर्णय घ्यावा, ही माझी पुन्हा मागणी आहे. ही घोषणा पाहून ‘उंटाच्या तोंडात जिरे’ असे मी म्हटले होते. पण, प्रत्यक्षात तर हा संपूर्ण प्रकार मे महिन्यात ‘एप्रिल फूल’ करणारा ठरला आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.