नाट्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत दामलेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची सदिच्छा भेट

मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत दामले (Prashant Damle) यांच्यासह नाट्यकर्मी नाटक समूहाच्या सर्व विजयी सदस्यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची सह्याद्री अतिथीगृहात सदिच्छा भेट घेतली.

नुकत्याच पार पडलेल्या नाट्य परिषद (Akhil Bharatiya Marathi Natya Parishad) निवडणुकीत नाट्यकर्मी नाटक समूहाने दणदणीत विजय मिळवला. प्रशांत दामले यांचे रंगकर्मी समूह पॅनल आणि प्रसाद कांबळी यांचे आपले पॅनल या दोन गटात चांगली चुरस रंगली होती. मुख्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी प्रशांत दामले यांची अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याच घोषणा केली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यकारिणीवर 11 जणांची निवड करण्यात आली. सुशांत शेलार, गिरीश महाजन, विजय चौगुले, संदीप तेंडुलकर, दीपा क्षीरसागर, सविता मालपेकर, संदीप पाटील, विशाल शिंगाडे, विजयकुमार साळुंखे, संजय रहाटे, दीपक रेगेंचा कार्यकारिणीत समावेश आहे.

हेही वाचा – दोन कोटींची नुकसान भरपाई; सर्वोच्च न्यायालयाने मॉडेलला बजावली नोटीस

या विजयानंतर सर्व सदस्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी या सगळ्यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या तसेच मराठी रंगभूमीच्या सेवेसाठी कार्यरत राहावे असेही सांगितले. तसेच राज्यकर्ते म्हणून कोणतीही मदत लागल्यास ती करण्यास तयार असल्याचे सांगून या साऱ्यांना आश्वस्त केले.

यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत, नाट्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि अभिनेते नाट्यनिर्माते प्रशांत दामले, निर्माते अजित भुरे, सतीश लोटके यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा – मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट कारभारात हस्तक्षेप करा; आदित्य ठाकरेंची राज्यपालांकडे मागणी