घरCORONA UPDATEआता कोरोनाचं कव्हरेज करणाऱ्या पत्रकारांनाही ५० लाखांचं विमाकवच!

आता कोरोनाचं कव्हरेज करणाऱ्या पत्रकारांनाही ५० लाखांचं विमाकवच!

Subscribe

अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांना कोरोनाशी लढा देताना जर मृत्यू आला तर ५० लाखांचं विमा कवच देण्याचा निर्णय राज्य सरकारने याआधीच जाहीर केला आहे. मात्र, आता त्यामध्ये पत्रकारांचा देखील समावेश करण्यात आला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. प्रसार माध्यमे आणि वृत्तपत्रांचा याआधीच कोरोना काळातल्या अत्यावश्यक सेवा म्हणून समावेश करण्यात आला आहे. मात्र, त्यांना पोलिस किंवा आरोग्य सेवकांप्रमाणे विमाकवच देण्यात आलं नव्हतं. यासंदर्भात अनेकदा मागणी देखील करण्यात आली होती. अखेर, राज्य सरकारने हा निर्णय घेतला असून त्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.

काय म्हणाले राजेश टोपे?

‘आरोग्य सेवक किंवा पोलिसांप्रमाणेच पत्रकार देखील कोरोनाच्या या संकटकाळामध्ये जीव धोक्यात घालून काम करत आहेत. बातमी किंवा माहिती मिळवण्यासाठी मेहनत घेत आहेत. त्यांची सेवा देखील राज्यासाठी महत्त्वाची आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचं वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना कोरोनाची लागण झाली, तर त्यांच्यावर उपचार होणारच आहेत. त्यातून ते बरे देखील होणार आहेत. मात्र, जर दुर्दैवाने यातून कुणा पत्रकाराचा मृत्यू ओढवला, तर त्याला ५० लाखांचं विमा कवच दिलं जाणार आहे. त्यासोबतच, कोरोना संकटकाळात या साथीशी संबंधित काम करणाऱ्या इतरही व्यक्तींना कोरोनाची बाधा होऊन त्यांचा मृत्यू ओढवल्यास ५० लाखांचं विमा कवच असणार आहे’, असं राजेश टोपे यांनी जाहीर केलं आहे.

- Advertisement -

दरम्यान, अशा प्रकारचं विमा कवच मिळवण्यासाठी एक अट देखील ठेवण्यात आली आहे. संबंधित पत्रकाराचा दुर्दैवी मृत्यू ओढवल्यास त्याच्या कुटुंबीयांना विमा संरक्षणाची रक्कम मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र आवश्यक असेल. सदर व्यक्ती पत्रकार आहे आणि कर्तव्य बजावत असताना त्यांना कोरोनाची लागण होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू ओढवल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी लिहून दिल्यानंतर ही रक्कम दिली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -