सोलापूर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी मराठा समाजाने सरकारला 24 डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. तोपर्यंत जरांगे पाटील हे राज्यातील मराठा बांधवांना भेटणार आहेत. ज्या ज्या ठिकाणी जरांगे भेट देत आहे त्या ठिकाणी मोठ्या जल्लोषात फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत करण्यात येत आहे. ते त्यांच्या सभेला उपस्थित असलेल्या मराठा बांधवांशी संवाद साधत आहेत त्यांच्या या सभांना मराठा नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. जरांगे पाटील यांची आज पहाटे चार वाजता कडाक्याच्या थंडीत सभा पार पडली. कडाक्याच्या थंडीतही हजारोंच्या संख्येने पुरूष, महिला, लहान मुलेही जरांगे पाटील यांना ऐकण्यासाठी वाट पाहत थांबले होते. यानंतर जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट करत मोठी घोषणा केली आहे. (next direction of Manoj Jarange patil movement was decided, a big announcement was made)
हेही वाचा – Manoj Jarange : कडाक्याच्या थंडीत वांगी येथे जरांगे पाटील यांची विराट सभा
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, आतापर्यंत सत्तेवर आलेल्या सगळ्याच सरकारने आमच्या लेकरांचे आतापर्यंत वाटोळे केले आहे. मराठा समाजासंदर्भातील पुरावे लपवलेले आहेत. पण लपवलेले पुरावे बाहेर येत आहे. म्हणून सरकार घाबरले आहे. आता आम्हाला आरक्षण मिळेल याची खात्री आहे. अन्यथा 24 डिसेंबरनंतर पुढचे आंदोलन मुंबईत असणार आहे. आमच्या रात्रीच्या सभाही हाऊसफुल्ल होत आहेत. रात्रंदिवस जागून आम्ही आशीर्वाद घेत आहोत. मराठा गाठीभेटीसाठी हा दौरा आहे.
तसेच, 24 डिसेंबरपर्यंत सरकार काय करते हे आम्ही बघत आहोत. आरक्षण बाबत निर्णय घेतला नाही तर पुढील दिशा ठरवणार आहोत. तशी वेळ येणार नाही, असा विश्वास आम्हाला आहे. परंतु वेळ आलीच तर आरक्षणासाठी आम्ही सज्ज आहोत. सरकारला कायदा पारीत करावा लागत असेल तर त्याला आधार पाहिजे आणि आता कुणबी नोंदी लाखांत सापडत आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत कायदा करण्यात काहीच अडचण नाही. सरकारवर माझा विश्वास आहे, असेही जरांगे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाबाबत ओबीसी समाजात रोष नाही. फक्त दोन-चार जणांचा हा विषय आहे. मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडत असल्यामुळे मराठा समाज पूर्वीपासूनच ओबीसीमध्ये आहे. सामान्य ओबीसींच्या लक्षात आले आहे की, मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण त्यांना दिले पाहिजे. परंतु राजकीय स्वार्थासाठी दोन-चार जणांची खटपट सुरू आहे, अशी टीका त्यांनी कोणत्याही ओबीसी नेत्याचे नाव न घेता केली आहे.