NFHS-5 Survey : भारतातील लहान मुलांमध्ये लठ्ठपणा वाढला- NFHS-5 सर्वेक्षण

Indian childrens obesity

देशातील पाच वर्षांखालील वयोगटाच्या मुलांमध्ये देशातील ३३ राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशात मुलांमध्ये स्थूलतेचे प्रमाण वाढत असल्याची माहिती नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (NFHS-5)मधून समोर आली आहे. ही स्थूलता वाढण्याचे कारण प्रामुख्याने शारिरीक व्यायामाचा अभाव आणि आरोग्याला अपायकारक अशा आहाराच्या सवयी हेच आहे. देशामध्ये लठ्ठ मुलांचे प्रमाण हे २.१ टक्क्यांवरून ३.४ टक्के इतके झाले आहे. दोन सर्वेक्षणातील ही आकडेवारी आहे. फक्त लहान मुलेच नव्हे तर महिला आणि पुरूषांमध्येही लठ्ठपणाचे प्रमाण वाढल्याची सर्वेक्षणातील आकेडेवारी आहे.

महिलांमध्येही लठ्ठपणा वाढला

महिलांमध्येही लठ्ठपणाचे प्रमाण वाढत असल्याचे सर्वेक्षणाच्या आकडेवारीतून समोर आले आहे. त्यामध्ये महिलांची आकडेवारी ही २०.६ टक्क्यांवरून २४ टक्के झाली आहे. तर पुरूषांचे प्रमाण हे १८.९ टक्क्यांवरून २२.९ टक्के इतके झाल्यांचे NFHS-5 सर्वेक्षणात आढळले आहे.

सर्वेक्षणात स्थूलता वाढल्याच्या आकडेवारीत अनेक राज्यांचा समावेश आहे. त्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, मिझोरम, त्रिपुरा, लक्षद्वीप, जम्मू आणि काश्मीर, उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, लडाख यासारख्या राज्यांचा समावेश आहे. याठिकाणी पाच वर्षे वयोगटापेक्षाही कमी वयोगटाच्या मुलांमध्ये स्थूलतेचे प्रमाण आढळून आले आहे. याआधीच्या NFHS-4 च्या २०१५-१६ या कालावधीतील सर्वेक्षणाच्या तुलनेत ही आकडेवारी वाढल्याचे समोर आले आहे.

फक्त गोवा, तामिळनाडू, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव यासारख्या ठिकाणी पाच वर्षे वयोगटाखालील लठ्ठ मुलांच्या टक्केवारीत घट दिसून आली आहे. सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार ३० राज्यात महिला आणि मुलांमध्ये लठ्ठपणा वाढल्याचे निदर्शनास आले आहे. तर ३३ राज्यांमध्ये केंद्रशासित प्रदेशात पुरूषांमध्येही लठ्ठपणा वाढल्याचे निदर्शनास आले आहे. महिला आणि पुरूष यांच्यातील वजनातील वाढ ही २५ किलोपर्यंत वाढल्याची आकडेवारी आहे. तर लहान मुलांच्या वजनामध्ये उंचीच्या तुलनेत वाढ झाली आहे.

गेल्या पंधरा वर्षात महिला, मुले आणि पुरूषांच्या वजनात सातत्याने वाढ झाल्याची आकडेवारी आहे. त्यामध्ये वाढलेली क्रयशक्ती, आहाराच्या वाईट सवयी आणि आरोग्याच्या बाबतीत चुकीच्या सवयीही कारणीभूत ठरल्या आहेत. सर्वसाधारणपणे कुटुंबांमध्ये वजन वाढणे किंवा स्थूलता वाढण्याची टक्केवारी ही किमान सहा टक्क्यांनी वाढल्याचे सर्वेक्षातून समोर आले आहे. तर कमाल टक्केवारी ३६ टक्के इतकी आहे. त्याचा संबंध हा उत्पन्नाशीही आहे. पण एकटे उत्पन्नच यासाठी कारणीभूत नाही. खाण्याच्या चुकीच्या सवयीही यासाठी कारणीभूत आहेत. त्यामध्ये लोकप्रिय अशा जंकफूडचा आहारात समावेश हे एक कारण आहे. अशा जंक फूडमध्ये साखरेपासून ते फॅट, प्रोटिन्स, विटॅमिन्स आणि मिनरल्सचा अभाव हेदेखील एक कारण समोर आले आहे.

अनेक भारतीय हे आरोग्यदायी आणि एक्टीव्ह लाईफस्टाईलसाठी प्रयत्न करत नसल्याचेही एक कारण समोर आले आहे. अनेकदा व्यायाम करण्यासाठीचे प्रोत्साहन न मिळणे तसेच नियमितपणे चालायला न जाणे यासारखी कारणेही सर्वेक्षणात आढळली आहेत. अनेकदा मुलांना आरोग्यदायी आणि पोषणयुक्त आहार न देण्याचे कारणही लठ्ठपणा वाढण्यासाठी कारणीभूत ठरले आहे.