मुंबापुरी २४ तास अखेर सुरू

रात्रीची मुंबईबाबत उत्सुकता

मुंबईतील बहुचर्चित नाईट लाईफ म्हणजेच मुंबई चोवीस तास ही संकल्पना अखेर रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झाली आहे. त्यामुळे नेहमी घडाळ्याच्या काट्यावर धावणारी मुंबई रात्री ही जागी राहणार आहे. त्यामुळे मुंबईत येत्या काळात रात्रीची मुंबई पाहणे देखील उत्सुकतेचे ठरणार आहे. या संकल्पनेनुसार आता मुंबईतील मॉल्स, हॉटेल्स, थिएटर्स ही रात्री ही सुरु राहणार आहेत. दरम्यान, ही मुंबई चोवीस तास सुरु झालेली असतानाच लवकरच त्याला नियमावलीची कवच देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

युवासेनाप्रमुख आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी नाईट लाईफची संकल्पना मांडली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी मंत्रीमंडळाच्या बैठकीत ही संकल्पना सुरु करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आल्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर २६ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून ही संकल्पना म्हणजेच मुंबई चोवीस तास सुरु करण्यात आले आहे. ज्यात मुंबईत रविवारी मध्यरात्रीपासून नाईट लाईफ सुरु झाली.

ज्यात रात्रभर मॉल, हॉटेल्स, थिएटर्स चालू राहणार आहेत. त्यामुळे आता मुंबईकरांना अगदी मध्यरात्रीही शॉपिंग आणि जेवण्याची हौस भागवता येणार आहे. दमुंबईच्या नाईट लाईफमध्ये पब आणि बारचा समावेश नाही. पब आणि बार यांना रात्री दीडपर्यंतच मद्यविक्रीची परवानगी असून यामध्ये कुठलाही बदल केलेला नाही.

या मुंबई चोवीस तासनुसार मुंबई पोलीस, मुंबई महापालिका, उत्पादन शुल्क विभाग, कामगार विभाग, पर्यटन विभाग यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदार्‍या असणार आहेत. त्यांची नेमकी काय काय जबाबदारी असणार याचे नियम बनवले आहेत. नाईट लाईफमध्ये सहभागी मॉल, रेस्टॉरंट यांनी नियम पाळणे गरजेचे आहे. याची विस्तृत नियमावली महापालिकेने बनवली आहे. रात्री दीड वाजल्यानंतर दारु बंद असणार आहे. रात्री दीड वाजेपर्यंतच मद्यविक्रीस परवानगी असणार आहे. तसेच रात्री दीडनंतर दारु विक्री करतानाही कोणीही आढळल्यास संबंधितांचा परवाना दोन वर्षांसाठी रद्द केला जाईल. त्याशिवाय त्याठिकाणच्या मॉल किंवा मिलला नाईट लाईफ सुरू ठेवण्यास परवानगी नाकारली जाणार आहे.

फूड ट्रक होणार सज्ज

मुंबईत गिरगाव चौपाटी, जुहू, वरळी सी फेस, वांद्रे बँडस्टँड, नरिमन पॉईंट रोड आणि एनसीपीए कॉर्नर या ठिकाणी फूड ट्रक म्हणजे वाहनावरील उपहारगृह लावण्यास परवानगी दिली जाईल. पण एका ठिकाणी पाच फूड ट्रक उभे राहतील. जे रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहतील. पण सध्या तरी हे फूड ट्रक सुरु नाहीत. लवकरच हे सुरु केले जाणार आहेत. मुंबईतील रेस्टॉरंटप्रमाणे मोठे मॉल सुद्धा चालू ठेवले जाणार आहेत. मात्र लोअर परेलमधील प्रसिद्ध फिनिक्स मॉलमधील 300 दुकानांपैकी फक्त 3 ते 4 दुकान सुरु होती. ही दुकानही रात्री 3 वाजेपर्यंत सुरु होती. नाईट लाईफ सुरू झाली असली तरी याचं नियोजन करण्यासाठी वेळ जात आहे, असे दुकानदारांचे म्हणणं आहे. दरम्यान, अनेकांनी या योजनेचे स्वागत केले असून यामुळे अनेकांना त्याचा फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया अनेकांन दिली.