राज्यात आता इथेनॉल निर्माण केलं पाहिजे अन् साखर कारखान्यांनी पेट्रोल पंप सुरू करावा – गडकरी

nitin gadkari

राज्यात आता इथेनॉल निर्माण केलं पाहिजे. तसंच, राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी पेट्रोल पंप सुरु करावा, असं आवाहन केंद्रीय रस्ते महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. केंद्राने शुगर केन ज्यूसपासून इथेनॉल निर्माण करायला परवानगी दिली आहे. त्यामुळे इथेनॉल निर्माण केलं पाहिजे, असं गडकरी म्हणाले. नितीन गडकरी यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यात आज ४ हजार ७५ कोटींच्या २५ महामार्गाचे भूमीपूजन आणि लोकार्पण सोहळा झाला. याच सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, नितीन गडकरी आणि विखे परिवार एकाच मंचावर उपस्थित होते.

यावेळी नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रात आता इथेनॉल निर्माण केलं पाहिजे, शुगर केन ज्यूसपासून इथेनॉल निर्माण करायला परवानगी दिली आहे. ४ हजार ५०० कोटी लिटर इथेनॉल निर्माण झाला, जेवढं इथेनॉल निर्माण होईल ते भारत सरकार विकत घेईल. इथेनॉल इंधन हे पेट्रोल पेक्षा चांगलं आहे. बाहेर देशात अमेरिका, ब्राझील आणि कॅनडामध्ये इलेक्ट्रिक आणि इथेनॉलवर गाड्या चालत आहेत. माझा आग्रह आहे ट्रान्सपोर्ट शंभर टक्के इथेनॉल झालं पाहिजे. बजाज आणि टिव्हिएसने इथेनॉल स्कुटर तयार केल्या आहेत, असं नितीन गडकरी म्हणाले.

बारा लाख कोटी रुपयांचे इंधन आयात करतो, पण आपला शेतकरी इथेनॉल निर्माण करू शकतो, इथेनॉल पंपाना परवानगी मिळाली आहे. मी सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. युरो ४ चे नॉर्म आहेत. त्यावर इथेनॉल वापरले तर शंभर टक्के प्रदूषण कमी होऊ शकते. फ्लेक्स इंजिन निर्माण झालं की सगळं इथेनॉलवर सुरू होईल. मी नागपुरात ३५ बसेस इथेनॉलवर चालवल्या आहेत. ब्राझील मध्ये इथेनॉल वर आहेत, येणाऱ्या काळात शेतकऱ्यांनी इथेनॉल इंधन निर्माण करतील आणि १२ लाख कोटी पैकी ५ लाख कोटी शेतकऱ्यांच्या घरात गेले तर कशाला शेतकरी गरीब राहील, असं गडकरी म्हणाले.