घरमहाराष्ट्रनाशिकNilesh Lanke : "राम मंदिराचा मुहूर्त गाठून...", निलेश लंकेचा विखे पिता-पुत्रांवर हल्लाबोल

Nilesh Lanke : “राम मंदिराचा मुहूर्त गाठून…”, निलेश लंकेचा विखे पिता-पुत्रांवर हल्लाबोल

Subscribe

अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील गारखिंडी आणि कळस गावच्या दौऱ्यातील एका कार्यक्रमात निलेश लंकेनी विखे पाटील पिता-पुत्रांवर तोंडसुख घेत जोरदार टीका केली.

अहमदनगर : राज्यात महायुतीचे सरकार असले तरी महायुतीतील घटक पक्ष असलेले भाजपा, शिवसेना आणि अजित पवार गटातील आमदार-खासदार एकमेकांवर टीका करताना दिसून येतात. ज्यामुळे कधीकधी महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चा रंगू लागतात. नुकतेच अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांनी भाजपाचे नेते, खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला. अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील गारखिंडी आणि कळस गावच्या दौऱ्यातील एका कार्यक्रमात लंकेनी विखे पाटील पिता-पुत्रांवर तोंडसुख घेत जोरदार टीका केली. ज्यामुळे एकाच गोटातील असून देखील लंकेंनी आपल्या सहकाऱ्यांवर निशाणा साधल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. (Nilesh Lanke criticism of Radhakrishna Vikhe Patil and Sujay Vikhe Patil)

हेही वाचा… Sanjay Raut : ‘इंडिया’ तुटत असताना महाविकास आघाडीचा विस्तार, ‘वंचित’सह 5 पक्षांचा समावेश

- Advertisement -

आमदार निलेश लंके यांनी आज मंगळवारी (ता. 30 जानेवारी) नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात असलेल्या गारखिंड आणि कळस गावचा दौरा केला. या दौऱ्यात विविध विकासकामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. या विकासकामांच्या शुभारंभानंतर लंकेनी आपल्या भाषणातून विखेंवर टीकेची झोड उठवली. यावेळी ते म्हणाले की, दिवाळीच्या मुहूर्तावर विखे पाटलांनी अहमदनगर उत्तरेत साखर आणि डाळ वाटप केली होती. त्यावरून विविध राजकीय आरोप प्रत्यारोप झाले. सुजय विखे दक्षिणेतून खासदार झाले आणि उत्तरेत साखर वाटप केली. त्यामुळे यावेळी ‘राम मंदिरा’चा मुहूर्त गाठून विखेंनी दक्षिणेत यथायोग्य साखर-डाळ वाटपाचे कार्यक्रम सुरू केले, असा टोला लंकेंनी लगावला.

तर, मी आमदार झालो त्याआधी सहा महिने ‘ते’ खासदार झाले, त्यांनी गावात किती कामे केली? एक रुपयाचे काम केले नाही. मी डाळ शेंगदाणे वाटणाऱ्यातला नाही. मी काम करणारा आहे. पाच वर्षांनी फिरकणारा मी माणूस नाही. नाहीतर काही लोक तुम्ही पाहिले असतील, थेट पाच वर्षांनीच डाळ गुळ घेऊन तुमच्या गावात आले असतील, असे म्हणत निलेश लंके यांनी विखेंच्या साखर डाळ वाटपावरून टीका केली.

- Advertisement -

लोक मेले आहेत की जिवंत आहेत, हे बघायला पुन्हा पाच वर्ष त्यांना वेळ नाही. डाळ-गुळ वाटणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका. मोठ्या लोकांच्या जास्त नादाला लागू नका. मी तुमच्या हक्काचा माणूस आहे. चुकलो तरी माझा कान धरून मी चुकलो आहे, असे तुम्हाला सांगता येईल. फक्त स्टेजवर भाषणे करणाऱ्या कर्तव्यशून्य लोकांवर जास्त विश्वास ठेवू नका, असा थेट निशाणा साधत निलेश लंकेंनी विखे पाटील पिता-पुत्रांवर शाब्दिक हल्ला चढवला.

माझ्याकडे कधीही हक्काने या, तुमच्या सेवेसाठी मी सदैव आहे. फक्त आचार संहितेत तुम्ही सांगितलेले काम व्हायचे नाही. माझा आणखी सहा महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक आहे. या कार्यकाळात तुम्ही सांगितलेले काम मी पूर्ण करेन, अशी ग्वाहीच यावेळी लंकेनी स्थानिकांना दिली. निलेश लंके हे त्यांच्या कामांसाठी प्रसिद्ध आहेत. कोरोना काळात निलेश लंकेंनी नगर जिल्ह्यात विशेष व्यवस्था केली होती. सामान्यांचा लोकनेता अशी लंकेंची नगर जिल्ह्यात ओळख आहे. परंतु, लंकेनी त्यांच्याच महायुतीतील सहकाऱ्यांवर केलेल्या टीकेमुळे आता हा वाद किती विकोपाला पोहोचणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -