घरताज्या घडामोडीधक्कादायक : बारसूत मटेरियल सप्लायच्या निमित्ताने जिलेटीन स्फोटकांचा साठा, निलेश राणेंचा गंभीर आरोप

धक्कादायक : बारसूत मटेरियल सप्लायच्या निमित्ताने जिलेटीन स्फोटकांचा साठा, निलेश राणेंचा गंभीर आरोप

Subscribe

तेजस्वी काळसेकर : सिंधुदूर्ग – बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या ठिकाणी अनेक कामे सुरू आहेत. या ठिकाणी मटेरियल सप्लायचेही काम सुरू आहे. हिच संधी साधून जिलेटिन स्टिकसारख्या स्फोटकांचा साठा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. ६ मे रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बारसूत येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. प्रकल्पाचे समर्थन करणारी ताकद मोठी आहे. तर विरोध करणाऱ्यांची ताकद कमी असल्यामुळे बाहेरचे लोक हे वातावरण बिघडवण्याचे काम करीत आहेत. येथे जमणाऱ्या गर्दीचा गैरफायदा घेऊन काही अनुचित प्रकार घडू नये व निरपराध लोकांना त्याचा त्रास होऊ नये, म्हणून जिलेटिन सारख्या स्फोटाचा साठा व त्यामागील गटाचा पोलीस व प्रशासनाने शोध घ्यावा, याकडे लक्ष वेधण्यासाठी माजी खासदार भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी सिंधुदुर्गनगरी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

निलेश राणे म्हणाले की, बारसू रिफायनरी परिसरात जवळपास 72 ठिकाणी बोरवेलचे काम सुरू आहे. या ठिकाणी मटेरियल सप्लाय करणारे बाहेरचे ठेकेदार आहेत. या मटेरियल सप्लायच्या माध्यमातून जिलेटिन स्टिक या स्फोटकांचा मोठा साठा या परप्रांतीय सप्लायरमार्फत सुरू झाला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी होणारा हा साठा गंभीर बाब आहे. या ठिकाणी आंदोलकांची गर्दी होऊन काही अनुचित प्रकार घडू नये. त्यामुळे आपल्या मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये, त्याची झळ बसू नये यासाठी ही माहिती आपण जाहीर करत आहोत.

- Advertisement -

निलेश राणे म्हणाले, मी तीन लोकसभा निवडणुका या मतदारसंघात लढवल्या आहेत. या भागातील नागरिकांचा विरोध असला तरी त्याची तीव्रता कमी आहे. या लोकांना भडकवण्याचे काम बाहेरची लोकं करीत आहेत. विरोधासाठी गर्दी जमवून त्या ठिकाणी चेंगराचेंगरी किंवा अनुचित प्रकार घडविण्याचा कट सुरू झाल्याचा आम्हाला संशय आहे. याबाबतची काही माहिती सूत्रांकडून माझ्यापर्यंत पोहोचली आहे. लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना याबद्दल माहिती देणार असल्याचेही राणे म्हणाले.

तसेच याबाबत पोलीसांनाही आवश्यकता भासल्यास माझ्याकडे असलेली माहिती देणार आहे. यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये व सर्वसामान्य नागरिकांना त्याची झळ बसू नये, एवढी आपली प्रामाणिक अपेक्षा आहे, असेही निलेश राणे यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बारसू येथे रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधासाठी येत आहेत. मुख्यमंत्री असताना त्यांना बारसू येथे रिफायनरी प्रकल्प हवा होता. तसे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून कळवलेही होते. आता तेच उद्धव ठाकरे प्रकल्प नको म्हणून बारसूत येत आहेत. तेथील लोकं बदलली की उद्धव ठाकरे बदलले हे जनतेसमोर आले आहे. या प्रकल्पाला लोकांच्या विरोधाची तीव्रता कमी असली तरी, त्यांना भडकवणाऱ्या लोकांची तीव्रता जास्त आहे. यासाठी बाहेरून लोक आणण्याचा व काहीतरी अनुचित प्रकार घडविण्याचा बाहेरच्या लोकांचा कट आहे, असाही आरोप राणेंनी केला आहे.

या कटात उद्धव ठाकरे यांचा काडीमात्र संबंध नाही. परंतु लोक जमवून आंदोलन करण्याचा, रिफायनरीला विरोध करून लोकांना भडकवण्याचा त्यांचा हेतू योग्य नाही. त्यांनी या प्रकल्पाविरोधात आंदोलन केले तर आम्ही बारसू प्रकल्पाच्या समर्थनार्थ आंदोलन करून ताकद दाखवून देऊ, असेही निलेश राणे म्हणाले. राजन साळवी यांच्या आव्हानाबद्दल  ते म्हणाले की, जैतापूर अणू ऊर्जा प्रकल्पाच्या भिकेवर मोठे झालेले हे नेतृत्व असून हिंमत असेल तर त्यांनी बारसू गावात जाऊन दाखवावे. मगच त्यांनी राणेंना रोखावे, असे आव्हान निलेश राणेंनी दिले आहे.


हेही वाचा : शरद पवारांच्या निर्णयामुळे मविआची ‘वज्रमूठ’ सुटली, पुढील सभा होण्याची शक्यता कमी


धक्कादायक : बारसूत मटेरियल सप्लायच्या निमित्ताने जिलेटीन स्फोटकांचा साठा, निलेश राणेंचा गंभीर आरोप
Tejaswi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejaswi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -