घरताज्या घडामोडीपंतप्रधान मोदी सामान्य माणसाची भाषा जाणणारे व्यक्तिमत्त्व, केंद्रीय अर्थमंत्र्यांचे गौरवोद्गार

पंतप्रधान मोदी सामान्य माणसाची भाषा जाणणारे व्यक्तिमत्त्व, केंद्रीय अर्थमंत्र्यांचे गौरवोद्गार

Subscribe

मुंबई : नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आधुनिक आणि परिवर्तनशील आहे. त्यांच्या नेतृत्वात विविध योजना आणि उपक्रमातून देशाला आत्मनिर्भर करण्याचे काम सुरू आहे. पंतप्रधान मोदी सामान्य माणसाची भाषा जाणणारे व्यक्तिमत्व असून त्यांच्यावर आधारित Modi@20 या पुस्तकात त्यांच्यातील व्यवस्थापन कौशल्याची झलक अनुभवायला मिळते असे गौरवोद्गार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काढले. त्या मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वीस वर्षाच्या पारदर्शक प्रशासकीय जीवनावर आधारित Modi@20 या पुस्तकावर आयोजित विशेष कार्यक्रमात गुरुवारी बोलत होत्या. वांद्रे कुर्ला संकुल येथील डायमंड बोर्स येथे कार्यक्रम संपन्न झाला.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, मोदी सरकारच्या काळात देशाने अमृतकाळाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. त्यांनी गुणवत्तेच्या आणि अंगभूत सामर्थ्याच्या जोरावर प्रशासनावर पकड मिळवली आहे. गुजरात भूकंप परिस्थिती हाताळताना त्यांच्यातील नेतृत्वाची चमक दिसली. पंतप्रधान मोदी कोणताही संकोच न बाळगता समोरच्याचे ऐकून घेण्यास प्राधान्य देतात. Modi@20 या पुस्तकात एका विशिष्ट उंचीवर गेलेल्या व्यक्तिमत्त्वांनी पंतप्रधान मोदीजींच्या कार्याचा आढावा घेतला आहे. अजित डोवाल यांनी नरेंद्र मोदी यांच्या धोरणात्मक मुत्सद्दीपणा यावर भाष्य केले आहे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी त्यांच्या विदेश नितीवर प्रकाश टाकला आहे याचा आढावा निर्मला सीतारामन यांनी घेतला.

- Advertisement -

अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, पंतप्रधान मोदी सगळ्या देश बांधवांची काळजी घेणारा नेता आहे. मोदी यांनी दाखवलेल्या धैर्य आणि सचोटीमुळे कोरोना काळात ‘फार्मसी ऑफ वर्ल्ड’ हा भारताचा गौरव पुन्हा अधोरेखित झाला. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या निमित्ताने भारतातील आरोग्य व्यवस्था आमूलाग्र बदलत चालल्याचा दावा निर्मला सीतारामन यांनी केला. मोदींनी आरोग्य व्यवस्थेच्या फेररचनेला हात घातला आहे, असेही त्या म्हणाल्या. हे पुस्तक नव्या पिढीला मार्गदर्शक ठरणारे असून प्रत्येकाने ते आवर्जून वाचावे असेही आवाहन निर्मला सीतारामन यांनी केले.

आमदार ॲड. आशिष शेलार म्हणाले की, सलग २० वर्षे अखंडपणे जनतेसाठी कार्यरत राहणारे नेतृत्व म्हणून पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख करावा लागेल. Modi@20 हे पुस्तक म्हणजे सामाजिक जीवनात निष्कलंक राहून कशी सेवा करावी याचा धडा देणारे आहे. पंतप्रधान मोदी यांनी संवाद, बांधिलकी आणि कटिबद्धता याला महत्त्व दिले. त्यांनी व्यवस्था परिवर्तनाची लढाई लढली आहे. त्यांनी शिक्षणातील आमुलाग्र बदलाला प्राधान्य दिले. समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना बरोबर घेऊन जाण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले. आयुषमान भारत, उज्वला गॅस आदी योजनामुळे गोरगरिबांच्या कल्याणाचा मार्ग सुकर झाला. पंतप्रधान मोदी यांनी भ्रष्ट व्यवस्थेचा किल्ला उद्धवस्त करण्याचे काम केले त्यांचे कार्य सत्याच्या वाटेवर चालण्याची प्रेरणा देईल असेही आमदार अॅड. आशिष शेलार म्हणाले.

- Advertisement -

खासदार पूनम महाजन यांनी प्रास्ताविक केले. पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता आणि महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार मनोज कोटक, मुंबई भाजपा उपाध्यक्ष आमदार पराग अळवणी, भाजपा महाराष्ट्र उपाध्यक्ष माधव भंडारी, आमदार योगेश सागर, आमदार मनिषा चौधरी, आमदार सुनील राणे, आमदार राजहंस सिंह, आमदार अमित साटम उपस्थित होते. अरुण मेहता यांनी आभार मानले.


हेही वाचा : महाविकास आघाडीसोबत जाऊन उद्धव ठाकरेंनीच गद्दारी केली, नारायण राणेंचा थेट निशाणा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -