घरCORONA UPDATEनिसर्ग चक्रीवादळ; रत्नागिरीला ७५ कोटी, सिंधुदुर्गास २५ कोटी जाहीर

निसर्ग चक्रीवादळ; रत्नागिरीला ७५ कोटी, सिंधुदुर्गास २५ कोटी जाहीर

Subscribe

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही फटका बसला आहे. संकटाचे परिणाम गंभीर असले तरी सरकार पूर्ण ताकदीने कोकणवासीयांच्या पाठीशी उभे राहील, असे सांगून तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीला ७५ कोटी रुपये आणि सिंधुदुर्गला २५ कोटी रुपये जाहीर केले. ठाणे व पालघर जिल्ह्यात तुलनेने कमी नुकसान झाले आहे मात्र तेथीलही आढावा घेतला जाऊन मग निर्णय घेतला जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. हे पॅकेज नसून तातडीची मदत आहे असेही ते म्हणाले. अशा नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाईचे जुने निकष बदलण्याची गरज असून नवे सुधारित निकष कसे असावेत त्याबाबत प्रशासनाने लवकरच माहिती सादर करावी म्हणजे निर्णय घेता येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीचा आढावा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला आणि लोकप्रतिनिधीच्या सुचना ऐकल्या व प्रशासनाला योग्य ते निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांनी सर्वाधिक फटका बसलेल्या रायगड जिल्ह्यास नुकतीच मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन पाहणी केली होती.

- Advertisement -

भूमिगत विद्युत तारांबाबत विचार

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, साहजिकच आहे की संकट किती गंभीर आहे यावर मी बोलणार नाही कारण कोकणवासियांनी ते अनुभवले आहे. सरकार तुमच्या सोबत आहे. लवकरात लवकर मी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नुकसानग्रस्त भागालाही भेट देईल. या संकटातून आपण काय शिकलो आहोत ते पाहिले पाहिजे असे म्हणून मुख्यमंत्री म्हणाले की, कोकण भागात भूमिगत विद्युत तारांची व्यवस्था करू शकतो का याचा विचार करावा लागेल. त्याचप्रमणे सिमेंटच्या पत्र्याला काही पर्याय आहे का किंवा कोकण किनारपट्टीवर कायमस्वरूपी सुरक्षितरित्या निवारे उभारता येतील का याचा विचार करणे गरजेचे आहे.

नागरिकांना विश्वासात घेऊन पंचनामे करा

मुख्यमंत्री म्हणाले की मदत कार्य करतांना तुम्ही प्राधान्य ठरवा,लोकांना विश्वासात घ्या. कुठलाही गैरसमज पसरू देऊ नका.प्रशासनातले अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा माणसेच आहेत, मनुष्यबळाचे योग्य नियोजन करा,पंचनामे तातडीने करून पाठवा, जिथे ठप्प झालेले असेल तिथे दळणवळण तातडीने सुरु करा, मोठ्या प्रमाणावर विजेचे खांब पडले असून तातडीने वीज पुरवठा सुरु करावा. अंतर्गत रस्ते दुरुस्त करून घ्या . आता पाउस येईल त्यामुळे अधिक मोठे आव्हान असेल. लहान लहान दुकानदार, व्यावसायिक, मूर्तिकार , मच्छीमार यांना तातडीने मदत करा

- Advertisement -

प्रशासनाचे कौतुक

कोरोनाच्या संकटाचे आव्हान असतांना आपण ज्या धैर्याने या वादळाचा सामना केला त्याला तोड नाही. जिल्हा प्रशासन, पोलीस, एनडीआरएफ, या जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, कोळी बांधव, इतर संघटना या सर्वांनी धीराने मुकाबला केला या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे कौतुक केले.

यावेळी बोलताना सिंधुदुर्गाचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांच्या तुलनेत सिंधुदुर्गाचे कमी नुकसान झाले असले तरी बऱ्याच ठिकाणी वीज यंत्रणेत बिघाड झालेला आहे आणि तो दुरुस्त करून पुरवठा सुरळीत व्हावा. गावांचे संपर्क रस्ते दुरुस्त करणे गरजेचे आहे. जिल्ह्याला कमीतकमी २५ ते ३० कोटी रुपये देण्याची गरज आहे असे ते म्हणाले.

रत्नागिरीचे पालकमंत्री ऍड अनिल परब रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी तिथूनच या कॉन्फरन्समध्ये सहभागी होऊन झालेल्या नुकसानीची माहिती दिली. विशेषत: मंडणगड, दापोली, तसेच रत्नागिरीला फटका जास्त बसला असून बरीच घरे उद्धस्त झाली आहेत. विजेचे खांब तुटले आहेत. शिधावाटप यंत्रणेतील धान्य भिजलेले धान्य बदलून नवे धान्य देण्यात येत आहे. घरांचे पत्रे उडाले आहेत. सध्या ते उपलब्ध नाहीत. आता पावसाळा येत असून लवकरात लवकर पत्रे उपलब्ध आकाराने गरजेचे आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे देखील रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यातून सहभागी झाले. ते म्हणाले की, फयान वादळापेक्षा जास्त नुकसान असल्याने प्रती कुटुंब रोख मदतीची नागरिकांची मागणी आहे. पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद आहेत त्यामुळे जनरेटर संच द्यावे लागतील. ट्रान्सफोर्मर्स, खांब पडले आहेत. वीज वितरणाचे इतर जिल्ह्यांतून कर्मचारी मागवावे लागतील. तसेच पडलेली झाडे तातडीने काढावी लागतील म्हणजे अडथळे दूर होतील.

पालघरचे पालकमंत्री दादाजी भुसे पालघर जिल्ह्यातील नुकसानीची माहिती दिली. यावेळी या जिल्ह्यांतून खासदार, आमदार तसेच इतर लोकप्रतिनिधी यांनी देखील आपल्या सूचना केल्या.

बागा नष्ट झाल्याने विवंचना

यावेळी बैठकीत जिल्हा प्रशासनातर्फे प्राथमिक स्वरूपात झालेल्या नुकसानीची विस्तृत माहिती देण्यात आली. विजेचे खांब पडणे, झाडे पडणे, घरांवरील पत्रे, कौले उडून जाणे , भिंती कोसळणे, तसेच अंतर्गत रस्ते खराब होणे , दळणवळण यंत्रणा ठप्प होणे असे नुकसान झाले आहे. सुपारी बागायतदार यांचेही प्रचंड नुकसान झाले असून ठिकठिकाणी नारळी, पोफळी, आंब्याच्या बागाच्या बागा उद्धस्त झाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच १५-१५ वर्षे जपून वाढवलेली ही झाडे नष्ट झाल्याने आता भविष्यात काय हा प्रश्न उभा ठाकला असल्याचे काही लोकप्रतिनिधी यांनी मांडले

नुकसान भरपाईची आगाऊ रक्कम देणार

चक्रीवादळाचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. विविध पथके तयार करून हे पंचनामे व्यवस्थित करण्यास सांगितले आहे. नुकसान भरपाईची काही आगाऊ रक्कम जिल्हाधिकारी यांच्या ताब्यात देऊन पंचनामे होताच ती देण्यात येईल त्यामुळे थोडासा दिलासा मिळेल. सध्याच्या घडीला केवळ दुरुस्ती नव्हे तर वीज यंत्रणेतील पायाभूत सुविधा उभारण्याचा अनुभव असलेल्या संस्था आणि कंपन्यांना तातडीने काम सुरु करण्याचे निर्देश महावितरणला दिले आहेत असेही मुख्य सचिव अजोय मेहता यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -