नितेश राणेंनी स्वीकारले सुप्रिया सुळेंचे आव्हान; नेमकं काय आहे प्रकरण?

लव्ह जिहादची नेमकी व्याख्या काय? त्याचा अर्थ कोणाला माहित असेल तर मी चर्चा करायला तयार आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. या वक्तव्याला उत्तर देत आमदार नितेश राणेंनी हे आव्हान स्वीकारत लव्ह जिहादच्या मुद्द्यावर मी चर्चा करायला तयार आहे, असे म्हंटले आहे.

लव्ह जिहादबाबत कायदा होण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यानंतर मुंबईत देखील याचे पडसाद उमटल्याने छत्रपती शिवाजी महाराज पार्क याठिकाणी सुद्धा मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. लव्ह जिहादची व्याख्या काय? त्याचा अर्थ जर कोणाला माहिती असेल तर मी चर्चा करायला तयार आहे, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याला प्रतिउत्तर देत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सुप्रिया सुळेंना चर्चा करण्याचे आव्हान दिले आहे.

सुप्रिया सुळेंना आव्हान करत नितेश राणे म्हणाले की, मी लव्ह जिहाद या मुद्द्यावर चर्चा करायला तयार आहे. मी हे आव्हान स्वीकारायला तयार आहे. लव्ह जिहाद कशाला म्हणतात? लव्ह जिहादच्या नावाखाली हिंदू मुलींना फसवलं जाते. त्यांचे आयुष्य खराब केले जाते. याची असंख्य उदाहरणे आणि या प्रकरणातील मुलींना भेटवण्यास देखील मी तयार आहे.

पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले की, कोणी कोणासोबत लग्न करावे, यावर आक्षेप नाही. परंतु लग्नाच्या नावाने, प्रेमाच्या नावाने आधी नाते अमर असते, त्यानंतर अमीन होते याला प्रेम प्रकरण म्हणता येणार नाही. लग्नानंतर हिंदू मुलींना नाव बदलायला सांगितले जाते. त्यांना कुराण वाचायला सांगितले जाते. इतकेच नाही तर तिला हिंदू सण साजरे करण्यास देखील बंदी केली जाते. काहींचे बळजबरीने धर्मांतर केले जाते. एखाद्या मुलीने धर्मांतर केले नाही तर तिला मारून टाकल्याची देखील अनेक उदाहरणे असल्याचे नितेश राणेंनी यावेळी सांगितले.

हेही वाचा – सत्यजित तांबे यांच्या आरोपावर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदरच….”

दरम्यान, सुप्रिया सुळे यांना आव्हान करताना नितेश राणे यांनी सुप्रियाताईंना ज्ञानात भर टाकायची असेल तर त्यांनी तारीख, वेळ ठरवावी. लव्ह जिहादमुळे हिंदू मुलींचे आयुष्य कसे बर्बाद होते. हे सगळं पुराव्यासकट सांगायला तयार आहे, असे म्हंटले आहे. तर लव्ह जिहादबाबत सर्व माहिती कळल्यानंतर त्या देखील खांद्याला खांदा लावून काम करतील, असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.