Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र हो,मी योग्य तेच बोललो; आमदार नितेश राणे आपल्या वक्तव्यावर ठाम

हो,मी योग्य तेच बोललो; आमदार नितेश राणे आपल्या वक्तव्यावर ठाम

Subscribe

केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता असताना जर ठाकरे सेनेचा सरपंच निवडून आला तर गावाचा विकास कसा होणार? राजकीय विरोधकांनाच केला प्रश्न

सध्या जोरदार चर्चेत असलेल्या नांदगांव ग्रामपंचायत निवडणूक प्रचार सभेतील वक्तव्याबाबत आमदार नितेश राणे ठाम आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर झालेल्या राजकीय टीकेनंतर त्यांनी आज कणकवलीतील प्रहार भवनात जिल्ह्यातील पत्रकारांशी संवाद साधला. मी काहीही चुकीचे बोललो नाही. जे बोललो ते अधिकार वाणीने बोललो असे ते म्हणाले. केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता असताना जर ठाकरे सेनेचा सरपंच निवडून आला तर गावाचा विकास कसा होणार? असा उलट प्रश्नही त्यांनी यावेळी आपल्या राजकीय विरोधकांना केला.

कणकवली मतदार संघातील जनतेशी माझे अतुट नाते आहे. या मतदारसंघाचा मी पालक आहे. त्यामुळे मला अधिकारवाणीने बोलायचाही हक्क आहे. नांदगांव येथील सभेत आपण योग्य तेच बोललो आहे. केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता असताना जर ठाकरे सेनेचा सरपंच निवडून आला तर गावाचा विकास कसा होणार? गावात निधी कसा येणार याचे सारासार उत्तर आमदार वैभव नाईक, परशुराम उपरकर यांनी द्यावे असे आव्हान आमदार नितेश राणे यांनी आज दिले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना कणकवली नगरपंचायतीला निधी दिला नाही. आपण सुचविलेली कामे डावलली गेली ,कणकवली नगरपंचायत वर अन्याय होत असताना नाईक व उपरकर शांत का होते, असाही प्रश्नही नितेश राणे यांनी यावेळी केला.

- Advertisement -

आज देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ज्या पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे भाजप पुरस्कृत सरपंच आणि उमेदवारांना तुम्ही जर मतदान केले नाहीत तर नेमका आपापल्या गावाचा विकास कसा होणार याचे विश्लेषण माझ्या विरोधात बोलत असणाऱ्या माझ्या प्रतिस्पर्थ्यांनी द्यावे. आपापल्या गावाचा विकास झालाच पाहिजे अशी भावना मतदारांमध्ये आहे. तो करून घेण्यासाठी मतदार १८ रोजी मतदान होणार आहे. ज्याचं पॅनल, उमेदवार निवडून येतील त्यांनी गावाचे प्रश्न रस्ते, पाणी, वीज, राज्य सरकारचा निधी, केंद्र सरकारचा निधी आणाव्यात. अशी भावना मतदारांची असते, म्हणून ते पॅनेल निवडून देतात. उद्या त्यांनी ठाकरे सेनेचा सरपंच निवडून दिला. तर मला प्रश्न विचारायचा आहे की, ठाकरे सेना पुरस्कृत पॅनेलचा सरपंच निवडून दिलात तर तुमच्याकडे निधी कशी येणार? नांदगांव येथील प्रचार सभेत जो मुद्दा आपण नांदगांव येथे मांडला.

तो मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. ज्या मतदारसंघामध्ये ३० ते ३२ हजार मतांनी निवडून आलो. त्या मतदारसंघात अधिकारवाणीने बोलणं हे मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने माझा हक्क आहे. माझा तो हक्क बजावताना काही गोष्टीची लोकांना जाणीव करून देत असेल तर त्यात काहीच चुकीचं नाही. मी जे बोललो ते मतदारसंघाचा पालक म्हणून बोलण्याचा माझा अधिकार आहे, मतदारांना कशापद्धतीने समजावयचे असतं हे मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. माझ्या आणि मतदारसंघाच्या नात्यामध्ये कोणीही ढवळाढवळ करू नये. माझ्या वक्तव्याबाबत मतदारांमध्ये आणि मलाही काही चुकीचे वाटले नाही. जे आपले विरोधक आहेत व प्रसार माध्यमांमध्ये जे शुभचिंतक मित्र आहेत त्यांना अगर ते चुकीचे वाटले असेल तर तो त्यांच्या मनोरंजनाचा भाग झालेला आहे व यातून कुणाला प्रसिद्धी मिळत असेल कुणाला पत्रकार परिषद घेण्याची संधी मिळत असेल. कुणाला आपल्या मालकांकडून वाहवा मिळत असेल तर आपण समाधानी असल्याचेही आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

- Advertisement -

राणे म्हणाले की, खासदार विनायक राऊत हे केंद्रात विरोधक आहेत. कुठलीही केंद्राची योजना अथवा निधी ते आणू शकत नाहीत. आमदार वैभव नाईक हे विरोधात आहेत. गेल्या साडे पाच महिन्यात आमदार नाईक हे आपल्या मतदारसंघामध्ये एक रूपयाचा तरी निधी आणू शकले आहेत का? याचे उत्तर त्यांनी अवश्य द्यावे. ग्रामपंचायतींना ग्रामविकास मंत्रालयामार्फत निधी येतो. या खात्याचे मंत्री गिरीश महाजन हे भाजपचे आहेत. गाव आणि शहरांना जोडणारे रस्ते बांधकाम खात्याकडून होतात. हे खातं रवींद्र चव्हाण यांच्याकडे आहे. तर सर्व निधी अर्थमंत्रालयाच्या माध्यमातून पाठवला जातो. हे खातं देखील भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे आहे. गावात रस्ते, पाणी, वीज इतर सेवा भाजपच्याच मंत्र्यांच्या माध्यमातून येणार आहेत. तर केंद्राच्याही योजना भाजप सरकारकडूनच येणार आहेत. विरोधी पक्षाचे उमेदवार निधी आणूच शकत नाहीत.

राणे म्हणाले की, पनवेल ते सिंधुदुर्ग पर्यंत भाजप पक्षाचा मी एकमेव आमदार आहे. त्यामुळे माझ्या पक्षाचे नेते माझ्या मतदारसंघावर अन्याय करणार का? मी दिलेली कामांची यादी नाकारणार का? मी एकमेव भाजपचा आमदार असेल तर मी माझ्या पक्षाचा लाडका नाही का? पक्ष माझे लाड करणार नाही का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नारायण राणे यांचे शिवसेनेत असल्यापासून घनिष्ठ संबंध आहेत. ते राणेंच्या मुलाच्या मतदारसंघाला कधीही डावलणार नाहीत. माझ्या एका शब्दाखातर त्यांनी कणकवली नगरपंचायतीला २२ कोटी रूपये दिले. हे आपणच आणू शकलो. म्हणून हक्काने बोलण्याचा अधिकार मला आहे. याची जाणीव मी माझ्या मतदारांना करून देत असेल तर त्यात चुकीचं काहीही नाही.

अडीच वर्षे मुख्यमंत्री असतानाचा कालावधीत कणकवली मतदारसंघावर महाविकास आघाडीने प्रचंड अन्याय केला. एकही साकव यादी स्वीकारली नाही. रस्ते यादी पाठवली त्याला मंजूरी नाही. मी जिल्हा नियोजनमध्ये संघर्ष केला पण आपण पाठवलेल्या याद्या बदलून टाकल्या जायच्या. ज्या ज्या नगरपंचायती माझ्याकडे होत्या, त्या नगरपंचायतीसाठी निधी दिला नाही. नितेश राणेचा मतदारसंघ म्हणून निधी दिला जात नव्हता. त्यावेळी परशुराम उपरकर, वैभव नाईक यांचा चुकीचं काही वाटलं नाही. तेव्हा त्यांनी उठाव का केला नाही. मी केलेलं वक्तव्य काहीही चुकीचं नाही. माझे मतदारांबरोबर अतुट नाते आहे. मतदार मलाही ओरडतात, आमदार चुकत असतील तर ते जरूर सांगतात. मी हक्काने ते वक्तव्य केलंलं आहे. जे माझ्याकडे ग्रामपंचायती देतील त्या ग्रामपंचायतींच्या विकासाची जबाबदारी माझी आहे. बिनविरोध झालेल्या गावांना मी ५० लाख रूपयांचा निधी देणार आहे. ज्यांच्याकडे विकास करण्याची क्षमता आहे त्यांच्या पाठीशी ग्रामस्थांनी उभे राहावे असेही आवाहन राणे यांनी केले.


शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून नवीन समस्या निर्माण होताहेत; अजित पवारांचा आरोप

हो,मी योग्य तेच बोललो; आमदार नितेश राणे आपल्या वक्तव्यावर ठाम
Tejasvi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejasvi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -