…तर, हिंदू गप्प बसणार नाही, भाजपा आमदार नितेश राणेंचा इशारा

rane

मुंबई : भाजपाच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. उदयपूर आणि अमरावतीमध्ये या प्रकरणी दोघांच्या हत्या झाल्यानंतर अहमदनगरमध्येही अलीकडेच एका तरुणावर हल्ला झाला. त्यावरून भाजपा आक्रमक झाली आहे. यापुढे असा घटना घडल्या तर, हिंदू गप्प बसणार नाही, असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी आज दिला.

प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या टिप्पणीबद्दल भाजपाने पक्षप्रवक्त्या नुपूर शर्मा यांना निलंबित केले आहे. त्यांच्या टिप्पणीवरून केवळ देशातच नव्हे तर, जगभरातून, विशेषत: मुस्लीम देशांमध्ये तीव्र पडसाद उमटले. राजस्थानच्या उदयपूरमध्ये शिवणकाम व्यावसायिक कन्हैयालाल तेली यांची हत्या करण्यात आली होती. त्यापाठोपाठ महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. तर, आता 4 ऑगस्टला अहमदनगरच्या कर्जत शहरात प्रतीक, उर्फ सनी राजेंद्र पवार या युवकावर एका गटाने हल्ला केला.

भाजपा आमदार नितेश राणे यांनी याचसंदर्भात आज पत्रकार परिषद घेतली. नुपूर शर्मा यांचा फोटो डीपी म्हणून ठेवल्याबद्दल प्रतीक पवार याला ८ ते १० मुस्लिमांनी घेरले. त्यांच्या हातात हत्यार होते. त्यांनी त्याला मारहाण केली. तो जमिनीवर कोसळला, तेव्हा तो मृत झाला समजून ते निघून गेले. त्यानंतर प्रतीकचे आप्त तिथे आले आणि त्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. त्याला 35 टाके पडले असून तो मृत्यूशी झुंज देत आहे, अशी माहिती नितेश राणे यांनी दिली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालणारा हा भारत देश आहे. या देशात शरिया कायदा लागू नाही. तसेच, नुपूर शर्मा हा विषय देखील बंद झाला आहे. तरीही असे हल्ले वारंवार होत असतील, हिंदूंना मारण्यापर्यंत मजल जात असेल तर, आमचे हात बांधलेले नाहीत, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

राष्ट्राच्या रक्षणासाठी शस्त्र उचलावे लागते तर, धर्माच्या रक्षणासाठी शास्त्राचा आधार घ्यावा, हे गीतेचे सार सांगून नितेश राणे म्हणाले, देशाच्या रक्षणासाठी जे काही करावे लागेल, ते आम्ही तयार आहोत. कोणीही हात लावण्याची हिम्मत करू नये. ज्यांच्यासाठी हा संदेश आहे, त्यांनी तो समजून घ्यावा. आम्ही समोरून कोणाच्या अंगावर जाणार नाही.

तिसरा डोळा उघडावा लागेल
इतर धर्मांच्या देवी-देवतांची विटंबना हिंदूकडून केली जात नाही. मात्र हिंदू देवी-देवतांची विटंबना वारंवार केली जाते. त्यावर आम्ही लोकशाही पद्धतीने आवाज उठवतो, असे सांगून आमदार नितेश राणे म्हणाले, आम्ही देवीदेवतांवर बोलल्यास विसरायला तयार नसाल तर, तर आम्ही गप्प का बसावे? लोकांच्या रक्षणासाठी हिंदूंनाही तिसरा डोळा उघडावा लागला.

पोलिसांवर आरोप
प्रतीक पवार यांच्या हल्ल्याचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे तेथील सर्व हिंदू संघटनांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा फडणवीसांच्या आदेशानंतर आरोपींवर एफआयआर दाखल झाला. पण अजूनही मुख्य आरोपी फरार आहेत. त्यांना अटक होईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, अशा इशाराही त्यांनी दिला.

प्रतीक पवार प्रकरणाचा तपास एनआयएकडे द्या
उदयपूरमधील कन्हैयालल प्रकरण तसेच अमरावतीतीतल कोल्हे हत्या प्रकरण या दोन्हीचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करीत आहेत. अहमदनगरमधील प्रतीक पवार यांच्या आम्ही पाठीशी असून या प्रकरणाचा तपासही एनआयएकडे द्यावा, अशी मागणी नितेश राणेंनी केली.

महाविकास आघाडीवर निशाणा
प्रतीक पवार हल्लाप्रकरणावरून नितेश राणे यांनी मागील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. आता राज्यात हिंदुत्ववादी विचारसरणीचे सरकार आहे. अल्पसंख्यमंत्री नवाब मलिक सुद्धा नाहीत. त्यामुळे असा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात घडता कामा नये. कोणत्याही हिंदूला टार्गेट केलं तर, जशास तसे उत्तर देता येते, असे नितेश राणे म्हणाले.