खेड – भीमाशंकरसह महाराष्ट्रातील २ मार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा, केंद्रीय परिवहनमंत्र्यांची घोषणा

Nitin Gadkari

महाराष्ट्रात शिंदे सरकार आल्यानंतर सर्वसामान्यांच्या कामाला गती मिळाली आहे. शिंदे सरकारप्रमाणेच आता केंद्रातील सरकार सुद्धा कामाला लागले आहे. महाराष्ट्रातील महामार्गांना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या ट्विटरवरून माहिती दिली आहे.

केंद्राच्या राष्ट्रीय महामार्ग ज्योतिर्लिंग जोडणी प्रकल्पाच्या अंतर्गत महाराष्ट्राती खेड – भीमाशंकर या राष्ट्रीय महामार्गाप्रमाणे आता बनकर फाटा-तळेघर या महामार्गालासुद्धा आता केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला आहे. या मार्गाच्या बांधकाम आणि नुतनीकरण विषयक कामांचे नियोजन करण्यात येणार आहे. लवकरात लवकर या महामार्गाचे काम पू्र्ण करुन तो नागरीकांना सूपुर्द केला जाणार आहे, असं नितीन गडकरी म्हणाले.

केंद्र सरकारचा या निर्णयामुळे एकूण ६६ किमी लांबीच्या या नवीन राष्ट्रीय महामार्गामुळे बनकर फाटा, जुन्नर, घोडेगाव, तळेघर ही महत्त्वाची शहरे जोडली जाणार आहेत. या महामार्गामुळे खेड, आंबेगाव व जुन्नर या तीनही तालुक्यांच्या पर्यटन विकासात भरीव वाढ होईल तसेच परिसरात सक्षम वाहतूक व्यवस्था निर्माण होण्यास मदत होईल, असं गडकरी म्हणाले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील रस्ते-वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने आणि पर्यटनाला चालना मिळण्याच्या उद्देशाने महामार्गांच्या निर्मितीसाठी व विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं गडकरी म्हणाले.

श्री क्षेत्र घृष्णेश्वर तसंच अजिंठा-वेरुळ लेणी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या व पर्यटकांच्या सोयीसाठी खुलताबाद-घृष्णेश्वर-एलोरा राज्य महामार्गास मोदी सरकारने राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला आहे, असं ट्विट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी करत नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.


हेही वाचा : अरे नवाब सेनेबरोबर कोणी राहणार आहे की नाही?, गजानन काळेंची ठाकरेंवर टीका