…तर पोरं कशी होणार?, तुम्हाला इनिशिएटिव्ह घ्यावाच लागेल; नितीन गडकरींचा अजब सल्ला

Nitin Gadkari
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

देवाचा आशीर्वाद जरुर पाहिजे, पण आशीर्वाद आहे म्हणून लग्न झाल्यावर तुम्ही काहीच केले नाही, तर पोरं कशी होणार असा चीमटा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काढला. आधुनिक शेतीविषयी समजवताना गडकरींनी हे उदाहरण दिले. यावेळी शेतकऱ्यांना वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रयोगांची मदत घेण्याचे आवाहन नितीन गडकरी यांनी केले.

देवाचा आशीर्वाद जरुर पाहिजे, पण आशीर्वाद आहे म्हणून लग्न झाल्यावर तुम्ही काहीच नाही केलंत, तर पोरं कशी होणार? तुम्हालाही काही इनिशिएटिव्ह घ्यावा लागेल की नाही. हे उदाहरण जास्त चांगले समजते, त्यामुळे तुम्ही प्रयत्नातून यशस्वी व्हा, माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढू नका, तुम्ही स्वतः प्रयत्न केलात तर नक्की यश मिळेल, माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, असे गडकरी म्हणाले.

याला पश्चिम महाराष्ट्र जबाबदार नाही –

शेती आपल्याला अशी करायची आहे की प्रथम क्रमांकावर शेती, द्वितीय क्रमांकावर व्यवसाय आणि तिसऱ्या क्रमांकावर नोकरी असे असले पाहिजे. तुम्ही मनात आणले तर वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रयोगाच्या आधारे प्रॉडक्टिव्हिटी वाढवून आणि खर्च कमी करून जागतिक बाजारपेठेत तुम्ही पोहोचू शकता. विलास शिंदे लंडनच्या बाजारात द्राक्षे पाठवत आहेत, तर आपली संत्री का जात नाही? आपण कशामुळे मागे आहोत? याला पश्चिम महाराष्ट्र जबाबदार नाही, तुम्ही जबाबदार आहात, असे नितीन गडकरी म्हणाले.

भूमिपुत्र शेतकरी संघटनेची माफीची मागणी –

विदर्भातल्या शेतकऱ्यांनी मेहनत केली पाहिजे, एखाद्या तरूणाचे लग्न करून देणे समाजाचे काम असते, लेकरे पैदा करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते ती त्याने करावी, अशा आशयाचे वक्तव्य नितीन गडकरी यांनी केले होते. या वक्तव्याविषयी गडकरींनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी एका पत्राद्वारे केली आहे.