पुणे : पुण्यातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या पुणे-बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकाच्या पुलाचे आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी नसल्याकारणाने ते कार्यक्रमाला गैरहजर राहिले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला अजित पवार यांनी नागपूरला मेट्रो नेण्याआधी ती पुण्यात द्यायची होती. मग ती कायमच भरून राहिली असती, असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याला उत्तर देत नितीन गडकरींनी पुणेकरांना टोला लगावला आहे. (Nitin Gadkari taunts Pune residents on the delay in Metro)
हेही वाचा – Nitin Gadkari : पुणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका; हवेतून चालणार बस
पुणे विद्येचे माहेरघर आहे. तसे नागपूरकरांचे नाही आहे. त्यामुळे पुण्यातील लोकांचे शिक्षण जास्त आहे आणि त्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करण्याची सवय असते. पुण्यात सगळ्यांना समजवणे कठीण आहे. ज्यामुळे पुण्यातील लोक अभ्यास करत राहिल्याने या पुणे मेट्रोला उशीर झाल्याचा खोचक टोला गडकरींनी लगावला. याशिवाय त्यांनी पुणेकरांच्या मनातील भावना या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलून दाखवल्या. आता पुणे वाढवू नका, आहे तेवढेच राहू द्या, असे आवाहन त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यातून केले.
कार्यक्रम सुरू होण्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी विविध विकासाच्या मुद्द्यावर नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करण्याची योजना नितीन गडकरींना सांगितली. त्यांच्या या योजनेबाबत बोलताना गडकरी म्हणाले की, पुणे शहरात कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प सुरु करण्याची योजना आहे. परंतु कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प करु नका, त्याऐवजी ग्रीन हायड्रोजन तयार करा. तेच भविष्य आहे. येणारा काळ हा हायड्रोजन, इथेनॉलचा आहे. त्यामुळे त्यासाठीचा विचार करा, असेही नितीन गडकरी यांच्याकडून सांगण्यात आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पुलाला चांदणी चौकाचा पुल का म्हणतात, याबाबत सांगितले. या पुलाचे खरे नाव एनडीए पुल आहे. पण पुलाच्या दगडावर चांदणी कोरलेली होती. म्हणून या पुलाला चांदणी चौक नाव पडले. पण आता या पुलाच्या नावावरून नवीन वादाला सुरुवात झाली आहे. याबाबत बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, आता चांदणी चौकाचे नवीन नाव दोन्ही दादांनी म्हणजेच चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांनी मिळून ठरवावे. मी त्याला मान्यता देईल, असे गडकरी यांच्याकडून सांगण्यात आले.