घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रटाळ-मृदंगाच्या गजरात निवृत्तीनाथ पालखीचे पळसेत स्वागत

टाळ-मृदंगाच्या गजरात निवृत्तीनाथ पालखीचे पळसेत स्वागत

Subscribe

नाशिक : संत निवृत्तीनाथांची पालखी सोमवारी (दि. ५) नाशिक शहरातून सिन्नरच्या दिशेने मार्गस्थ झाली. पालखीचा मुक्काम नाशिकपासून जवळच असलेल्या पळसे गावात होता. पळसे येथील ग्रामस्थांनी आणि स्थानिक भजनी मंडळांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात, शालेय विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाच्या माध्यमातून तसेच पळशी येथील स्थानिक महिलांनी ठिकठिकाणी सडारांगोळी घालून दिंडीचे भव्य स्वागत केले.

पळसे ग्रामस्थांच्या वतीने निवृत्तीनाथांच्या पायी पालखी सोहळ्याचे स्वागत मागच्या पाच पिढ्यांपासून सातत्याने केले जाते. साधारणपणे पालखी सोहळा सुरू झाल्यापासून पहिल्यांदा निवृत्तीनाथांच्या पालखीचा मान पळसेकरांकडेच होता, असे हभप तानाजी गायधनी यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. ते म्हणाले की, सुरुवातीच्या काळात जेव्हा साधनांची उपलब्धता नव्हती त्यावेळी निवृत्तीनाथांच्या पादुका खांद्यावर घेऊन पळसे ग्रामस्थ पंढरपूरला जात असत. अगदी परतीची वारी देखील पळसे ग्रामस्थांकडूनच पूर्णत्वास जात असे. नंतरच्या काळात जेव्हा पालखी सोहळ्याला अनेक हात लागले त्यावेळी मात्र साधनांची उपलब्धता अधिक झाली आणि नाथांच्या पादुका खांद्यावर नेण्याऐवजी प्रथमतः बैलगाडीत नेल्या जात असत. त्यातही पळसे गावाचा अधिक सहभाग होता.

- Advertisement -

पळसेकर हे पायी पालखी सोहळ्यातील मागच्या पालखीच्या दांडीचे मानकरी म्हणून ओळखले जात होते. चार ते पाच पिढ्यांपासून ही परंपरा अखंडितपणे सुरू आहे. यंदाही नाथांच्या पालखीचे भव्य स्वागत पळसेकरांनी केले. कथा, कीर्तन झाल्यानंतर दरवर्षीप्रमाणे यंदाही वारीतील वारकर्‍यांना महाप्रसाद दिला गेला.

निवृत्तीनाथांची पालखी म्हणजे आम्हा पळसेकरांसाठी दिवाळी-दसराच होय, असे गौरवोद्गारही गायधनी यांनी यावेळी काढले. संध्याकाळी पालखी सोहळ्यातील परंपरेने हभप बाळकृष्ण महाराज डावरे यांचे चला पंढरीसी जाऊ, रखमादेवी वरा, पाहू डोळे निवतील, कान-
मनात मना तेथे समाधान या अभंगावर हरी कीर्तन झाले. यावेळी त्यांनी पंढरीचे महत्व विशद केले. मोक्ष प्राप्तीसाठी वारी गेल्या शंभर वर्षांपासून पळसे येथील पालखी स्वागताची परंपरा असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. आजचा पालखीचा मुक्काम सिन्नर तालुक्यातील लोणारवाडीत होणार आहे. पालखी सोहळा प्रमुख नारायण मुठाळ यांनी पळसेकरांबद्दल बोलताना सांगितले की, पळसेकरांची आणि वारकर्‍यांचे ऋणानुबंध पिढ्यानपिढ्याचे आहेत. पळसेकर आम्हा वारकर्‍यांना हक्काचे आहेत. पंढरीच्या वाटेवर असणारे पळसे गाव नात्याने तर आमचे जवळचे आहेच; पण त्याहीपलीकडे पळसेकरांवर आम्ही वारकरी म्हणून अधिक हक्क सांगू शकतो. कारण पळसेकरांचे आणि वारकर्‍यांची अतूट भावबंध आहेत जे पंढरीच्या विठुरायानेच निर्माण केलेले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -