घरताज्या घडामोडीनाशिकमध्ये सफाई कर्मचारी भरतीचा ‘बाजार’; दलालांना राजकारण्यांची साथ

नाशिकमध्ये सफाई कर्मचारी भरतीचा ‘बाजार’; दलालांना राजकारण्यांची साथ

Subscribe

तपोवनातील लॉन्समध्ये गुरुवारी सुरु होता ‘उद्योग’; १५ ते ३० हजारांची ‘भाव’

महापालिकेच्या ७०० सफाई कर्मचार्‍यांची भरती करण्यास न्यायालयाने परवानगी देताच आता या जागांसाठी पैसे उकळण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. यासाठी काही दलालही कार्यरत झाले असून तपोवन परिसरातील शिव शंकराच्या नावाने असलेल्या एका बड्या लॉन्समध्ये गुरुवारी (दि. ११) दिवसभर हा भरतीचा ‘बाजार’ भरल्याचे कळते. १५ हजारांपासून ३० हजार रुपयांपर्यंतची माया प्रत्येक इच्छुक उमेदवाराकडून आकारली जात असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे या ‘उद्योगात’ काही नगरसेवकांसह राजकीय पदाधिकार्‍यांचाही सहभाग असल्याचे कळते.

सातशे सफाई कर्मचारी भरतीच्या निविदा प्रक्रियेमध्ये वादग्रस्त वॉटरग्रेसला नियम डावलून पात्र केल्यामुळे नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. त्यामुळे या निविदेचे बराच काळ भरतीचे घोंगडे भिजत पडले होते. मात्र मध्यंतरी केरोनाच्या पार्श्वभूमीवर ही भरती कशी आवश्यक आहे हे पटवून देण्यात उच्च न्यायालयामध्ये संबंधित मक्तेदारास यश मिळाल्यामुळे स्थगिती उठवली गेली. त्यातून आरोग्य विभागाने पंधरा दिवसांमध्ये सफाई कर्मचारी नियुक्त करून साफसफाई सुरू करावी असे आदेश दिल्यामुळे सध्या संबंधित प्रक्रिया सुरू झाली आहे. एक वर्षासाठी कंत्राटी स्वरूपामध्ये सफाई कर्मचारी नियुक्त करण्यासाठी सर्व जबाबदारी ठेकेदारावर सोपवण्यात आली आहे. ठेकेदाराने कर्मचारी नियुक्तीसाठी जमवाजमव सुरू केली असताना मधेच काही दलाल कार्यरत झाले असून परस्पर शहरातील बेरोजगारांना भेटून महापालिकेत नोकरी लावून देतो दहा ते तीस हजारापर्यंत खर्च येईल असे सांगत आहे. सुरुवातीचे एक वर्ष कंत्राटी असून त्यानंतर पालिका कायमस्वरूपी सामावून घेईल असे सांगताना ते यापूर्वी रोजंदारीवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना कायमस्वरूपी कसे केले गेले याचा दाखला देत आहे.

- Advertisement -

कंत्राटी पद्धतीने संबंधित भरती होत असली तरी कोणाला नियुक्त करायचे यासंदर्भातील निर्णय सर्वस्वी ठेकेदाराचा आहे. दुसरीकडे आमदार व नगरसेवकांकडे असलेले अनेक कार्यकर्ते भविष्यात कायमस्वरुपी नोकरी मिळेल म्हणून आमची वर्णी लावून द्या असा तगादा लावत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराकडे काही लोकप्रतिनिधी त्यांच्या कार्यकर्त्यांची भरती करण्यासाठी तगादा लावत आहेत. इतकेच नाही तर या भरतीच्या नावाने काही दलालही कार्यरत झाल्याचे कळते. उमेदवाराची आर्थिक परिस्थिती बघून त्यांच्याकडून पैसे लाटले जात असल्याचे कळते. तपोवन परिसरातील एका लॉन्समध्ये भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना बोलवण्यात आले होते. त्यामुळे मेळाव्यासारखे स्वरुप या परिसराने धारण केले होते. यावेळी दोन गटांमध्ये हमरीतुमरीचा प्रकारही झाल्याचे समजते.

ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार असल्याने त्याचा थेट महापालिकेशी संबंध नाही. महापालिकेत कायमस्वरूपी नोकरीचे आमिष कोणी दाखवत असेल तर पुराव्यानिशी तक्रार करावी. तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाईल. यासंदर्भात पोलिस आयुक्तांशी बोलून कारवाई केली जाईल.

– राधाकृष्ण गमे, आयुक्त, महापालिका

नाशिकमध्ये सफाई कर्मचारी भरतीचा ‘बाजार’; दलालांना राजकारण्यांची साथ
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.

एक प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -