चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई यांचा बेळगाव दौरा रद्द?, बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून नो एण्ट्रीचे आदेश जारी

कागल – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर, अक्कलकोटसह जत तालुक्यातील ४० गावांवर दावा केल्यापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न चांगलाच तापला आहे. बोम्मईंच्या आव्हानाला प्रत्युत्तर म्हणून सीमाप्रश्नी नेमलेले समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई मंगळवारी बेळगावमध्ये जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची भेट घेणार होते, मात्र हा दौरा आता रद्द झाल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यातच दुसरीकडे कागलमार्गे महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात प्रवेश करता येणार नाही, असे आदेश बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून सोमवारी जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे शिंदे सरकार कर्नाटकपुढे झुकते घेणार की बेळगावात प्रवेश करण्याची धमक दाखवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याआधी चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांचा बेळगाव दौरा 3 डिसेंबर रोजी ठरवण्यात आला होता, परंतु 6 डिसेंबरला स्थानिक संघटनांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिवादन कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण दोघांना दिले. त्यामुळे हा दौरा 3 ऐवजी 6 डिसेंबरला करण्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते, परंतु महाराष्ट्राचे मंत्री बेळगावात आल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये, अशी तंबी बसवराज बोम्मई यांनी दिली होती, परंतु आता थेट बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून आदेश काढण्यात आल्याने हा दौरा स्थगित झाल्याचेच म्हटले जात आहे.

यासंदर्भात बोलताना शंभूराज देसाई यांनी सांगितले की, कर्नाटक सरकारला आम्ही आमच्या दौर्‍याबाबत विस्तृत माहिती दिलेली नाही. सध्या तरी हा दौरा अधिकृतरित्या रद्द केल्याचे कळवलेले नाही. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांशी चर्चा करून आम्ही दोघेही त्यांच्या आदेशानुसार पुढील निर्णय घेणार आहोत.