घरताज्या घडामोडीमंत्रिमंडळ विस्तार; शपथविधीचे भाजपला निमंत्रणच नाही

मंत्रिमंडळ विस्तार; शपथविधीचे भाजपला निमंत्रणच नाही

Subscribe

महा विकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार दि. ३० डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता विधानभवन येथे होणार असून, या विस्ताराच्या कार्यक्रमाला भाजप नेत्यांना सरकारने अद्याप निमंत्रणच दिले नाही. त्यामुळे निमंत्रण नसल्याने भाजप नेते या कार्यक्रमाला जाणार नसल्याची माहिती भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने आपलं महानगरशी बोलताना दिली. दरम्यान २८ नोव्हेंबरला शिवाजी पार्क येथे झालेल्या शपथविधी सोहळ्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे इतर नेते उपस्थित होते. मात्र ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मात्र सरकारने अद्याप तरी दिलेले नाही.

विधानसभा निवडणूक एकत्र लढलेल्या शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरून जुंपली आणि शिवसेनेने काडीमोड घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी – काँग्रेसच्या मदतीने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. भाजपकडून आणि विशेषतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या दिवसापासून ठाकरे सरकारवर जोरदार टीका करायला सुरूवात केली. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात देखील भाजपने शिवसेनेलाच टार्गेट केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे सातत्याने सरकारला विरोध करणाऱ्या आणि सर्वाधिक जागा जिंकत विरोधी बाकावर बसलेल्या भाजपला सरकारने शपथविधी कार्यक्रमाचे निमंत्रण दिले नसल्याची चर्चा देखील आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

- Advertisement -

शिवाजी पार्क येथे २८ नोव्हेंबरला रोजी झालेल्या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची शिवसैनिकांनी खिल्ली उडवल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावेळी शिवाजी पार्कवर उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी ‘मी पुन्हा येईन’, असे म्हणत भाजपची आणि विशेषत: देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली होती. २८ नोव्हेंबर नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी तब्बल एक महिना घेतल्यामुळे महाविकास आघाडीच्या मंत्रिंमंडळ विस्तारावर भाजपकडून टीका होऊ लागली. “मंत्रिमंडळ विस्तारासाठी सरकारला शेवटी गागाभट्ट भेटले”, अशी टीका भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केली होती. “अभी तो ये झाकी है, मथुरा काशी बाकी है. आता कुठे सुरुवात झाली. लोकांना कळेल काय होतं काय नाही?” अशी प्रतिक्रिया लाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

कार्यक्रमावर बहिष्कार नाही

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे भाजप ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या शपथविधी कार्यक्रमावर बहिष्कार घालणार अशी चर्चा रविवारी दुपारपासूनच सुरू झाली होती. मात्र याबाबत भाजपच्या नेत्यांना विचारले असता त्यांनी जर कार्यक्रमाचे निमंत्रणच आले नाही तर बहिष्कार घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगत यावर जास्त बोलणे टाळले.

आम्हाला अद्याप तरी कार्यक्रमाचे निमंत्रण आलेले नाही. उद्या हा कार्यक्रम किती वाजता आहे, हे देखील आम्हाला माहिती नाही. जर कार्यक्रमाचे निमंत्रण आले तर आम्ही नक्की जाऊ. – सुधीर मुनगंटीवार, माजी अर्थमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -