घर उत्तर महाराष्ट्र दिव्यांगाच्या विकासासाठी कायद्याचा बाऊ नको; आ. बच्चु कडू यांचे निर्देश

दिव्यांगाच्या विकासासाठी कायद्याचा बाऊ नको; आ. बच्चु कडू यांचे निर्देश

Subscribe

 दिव्यांग आपल्या दारी उपक्रमात विविध सेवांचा दिला लाभ

नाशिक : आम्ही आमदार, खासदार एखादा कायदा तोडतो. दिव्यांग बांधवांच्या घरासाठी कायदा तुटला तरी हरकत नाही असे सांगत दिव्यांग बांधवांना त्यांचा हक्क मिळवून द्या असे प्रतिपादन दिव्यांगांच्या दारी उपक्रमाचे मुख्य मार्गदर्शक आमदार बच्चु कडू यांनी केले. शहरातील ठक्कर डोम येथे आयोजीत ‘दिव्यांगाच्या दारी’ या उपक्रमाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी दिव्यांगांसाठी राबविण्यात येणार्‍या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, आयुक्त तथा प्रशासक मालेगाव महानगरपालिका भालचंद्र गोसावी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जून गुंडे, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदिप चौधरी, उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे उपस्थित होते.

- Advertisement -

यावेळी बोलतांना आमदार बच्चु कडू म्हणाले, जगातले आणि देशातले पहिले दिव्यांग मंत्रालय आपल्या राज्यात आहे. आमच्या परभणी इथल्या कलेक्टरने एक दिवस दिव्यांग बांधवांसाठी ठेवला.त्याचप्रमाणे अधिकार्‍यांनीही एक दिवस दिव्यांगांसाठी द्यावा. दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र घरकुल योजना हवी. ज्या मुख्यमंत्री महोदयांनी मंत्रालय दिले, ते याला निधी कमी पडू देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जर अधिकार्‍यांनी दोन पावले दमदार टाकले, तर दिव्यांग बांधव चार पावले टाकतील. आम्हाला हात, डोळे आहे. पण काही गोष्टी कमी असलेले माणसं जिद्दीने जगत असतात. तुमच्याकडे पाहिल्याने आमचं दुःख निघून जाते. दिव्यांग बांधव एक नवीन विश्वास मनात घेवून सर्व क्षेत्रात अग्रेसर राहीला हिच दिव्यांग मंत्रालयाची संकल्पना असून ती प्रत्यक्षात साकारण्याच्या दृष्टीने सदैव प्रशासनाच्यावतीने प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला दिव्यांग बांधवांसाठी उभारण्यात आलेल्या स्टॉल्सचे फित कापून बच्चू कडू यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यांनतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यावेळी भावना चांडक नॅब स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सीमा पेठकर तर आभार प्रदर्शन महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदिप चौधरी यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्यने जिल्हाभरातील दिव्यांग बांधव व त्यांचे पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिव्यांग बांधवांना कार्यक्रमाच्या ठिकाणी आणण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची व्यवस्था करण्यात आली होती.

यांचा होता सहभाग

- Advertisement -

या मेळाव्यात दिव्यांग वित्त विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मकार चर्म उद्योग विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ, यांच्याबरोबरच बार्टी, महाज्योती, सारथी, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, महानगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व तसेच विविध सेवाभावी संस्थांनी सहभागी होत दिव्यांग बांधवांना विविध सेवांचा लाभ मिळवून दिला.

- Advertisment -