Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र गुढीपाडव्याला दंगली झाल्या नाहीत, रामनवमीला असे का व्हावे, तपासणे गरजेचे : संजय...

गुढीपाडव्याला दंगली झाल्या नाहीत, रामनवमीला असे का व्हावे, तपासणे गरजेचे : संजय राऊत

Subscribe

संजय राऊत यांनी छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची सभा होणारचं असे सांगितले आहे. तर गुढीपाडव्याला दंगली झाल्या नाहीत, मग राम नवमीला असे का व्हावे, याचा तपास करण्यात यावा असे खासदार संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले.

रामनवमीच्या आदल्या दिवशी बुधवारी (ता. २९ मार्च) रात्री छत्रपती संभाजीनगर येथे दोन गटात क्षुल्लक कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारी आणि दगडफेकीत झाले. या घटनेवरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यात आला आहे. तर महाविकास आघाडींच्या सभांमुळे राज्य सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणून असे कट रचण्यात येत असल्याचे खासदार संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले.

प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, राजकारणात असलेल्या अदृश्य शक्तींशिवाय या दंगली होणे शक्य नाही. आठ दिवसांपूर्वी महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा झाला. त्यावेळी देखील राज्यात अनेक ठिकाणी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शोभायात्रा काढण्यात आल्या. अत्यंत उत्तम पद्धतीने शोभायात्रा निघाल्या. त्यावेळी दंगली झाल्या नाही. त्यावेळी कोणी एकमेकांवर दगडफेक केली नाही. मग आता रामनवमीच्या निमित्तानेच हे प्रकार का व्हावे? हा एक तपासाचा आणि संशोधनाचा विषय आहे. जर महाराष्ट्रातल्या सरकारला तपास करता येत नसेल, तर या घटनेची माहिती आम्ही त्यांना देऊ.

- Advertisement -

तर, दंगल सदृश परिस्थिती निर्माण करून सभा रद्द होईल, हे चुकीचे आहे. सभा ठरल्याप्रमाणे होईल. त्यात कोणताही बदल होणार नाही. सभा रद्द होणार नाही. छत्रपती संभाजीनगरमधील सभेसाठीची तयारी पूर्ण झाली आहे. आमच्यावर काही अटी शर्थी लावल्या जातील पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही टिकवण्यासाठी लढणारे आम्ही लोक आहोत. त्यामुळे जे आम्हाला बोलायचे आहे, ते बोलावे लागेल. या जाहीर सभेला हजारो लोकं येतील. पण कोणाला सभा थांबवता येणार नाही, असे ठामपणे खासदार संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

तसेच, छत्रपती संभाजीनगर येथे तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. कारण सभेला गालबोट लागावे, यासाठी. सभा होत आहेत म्हणून डॉ. मिंधे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सभा होऊ द्यायच्या नाही, सभेच्या आयोजकांवर, कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करायचे, यासाठी हे वातावरण निर्माण केले जात आहेत. हे महाराष्ट्रात आधी कधीच झाले नाही, पण ते आता घडवण्याचा प्रयत्न होत आहे, अशी टीका संजय राऊत यांच्याकडून यावेळी सरकारवर करण्यात आली.


- Advertisement -

हेही वाचा – कायम धगधगत राहिले छत्रपती संभाजीनगर, असा आहे दंगलींचा इतिहास

- Advertisment -