Sunday, February 28, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र अवकाळी पाऊस, गारांनी राज्याला झोडपले

अवकाळी पाऊस, गारांनी राज्याला झोडपले

प. महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भातील मोठे नुकसान

Related Story

- Advertisement -

हवामान खात्याने दिलेल्या इशार्‍यानुसार राज्यातल्या पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भाला गुरुवारी भल्या पहाटे आणि सकाळी अवकाळी पावसाने झोडपले. सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद अकोला, परभणी, भंडारा या जिल्ह्यांसह अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. सिंधुदुर्ग, नाशिक, रायगडमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या गारा पडल्या. त्यामुळे आंबा, द्राक्ष, हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

कोकणात विशेषत: रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गारांसह तुफान पाऊस पडला. गुरुवारी सकाळी सिंधुदुर्गातील अनेक तालुक्यांमध्ये गारांचा पाऊस पडला. या पावसामुळे सिंधुदुर्गात आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी आंब्याचा मोहोर गळून पडला. रायगड जिल्ह्यातही अनेक ठिकाणी गारा पडल्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले.

- Advertisement -

सांगलीतल्या अवकाळीच्या धुमाकुळाने द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात आला आहे. अनेक भागांमधील द्राक्षाची निर्यात झाली नाही. त्यामुळे द्राक्ष बागायतदार चिंतेत आहे. तिकडे परभणीतल्या पावसाने ज्वारी, हरभरासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

परभणी जिल्ह्यात बुधवारी रात्री अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. परभणी, पोखर्णी, दैठणा या परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे ज्वारी, हरभरा पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुक्यातल्या उपळा गावासह काही भागात रात्री साडे आठनंतर पावसाचा शिडकावा झाला. उस्मानाबाद शहर आणि परिसरामध्ये काल ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. या पावसामुळे ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यातल्या अकोट, तेल्हारा भागात काल अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी बरसणार्‍या पावसामुळे शेतकर्‍याची चिंता वाढली आहे..

भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी, तुमसर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सगळ्यांचीच तारांबळ उडाली.

बागलाण तालुक्यात गारपीट; बळीराजा पुन्हा अडचणीत

 बागलाण तालुक्यातील अंतापूर परिसरात गुरुवारी (दि. १८) दुपारी पाच वाजेच्या दरम्यान अचानक झालेल्या वादळी वार्‍यासह गारपिटीचा पाऊस झाला. यामुळे शेतात सर्वत्र गारांचा खच साचून रब्बी हंगामातील कांदा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कांद्याची पात पूर्णत: भुईसपाट झाली आहे. तालुक्यात गारपिटीचे सर्वाधिक प्रमाण अंतापूर परिसरात असून याव्यतिरिक्त मुल्हेर, ताहाराबाद, करंजाड, पिंगळवाडे, मुंगसे, जाखोड, वटार, केरसाणे परिसरात सौम्य गारपीट झाली. नुकसानीची तीव्रता अंतापूर परिसरात असून गुरुवारी दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन सायंकाळी जोरदार वार्‍यासह गारपीट सुरू झाली. सकाळी ऊन जाणवत होते. मात्र, दुपारी 2 वाजेच्या दरम्यान अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले. तर लगोलग 5 वाजेच्या सुमारास वादळीवार्‍यासह बोरांच्या आकाराच्या गारांचा वर्षाव सुरू झाला. वादळी वार्‍यासह जोरदार गारपीट व पाऊस झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली. हजारो हेक्टरवरील रब्बी हंगामातील कांदा, गहू, हरबरा, आंबा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

कृषीमंत्री भुसे आज पाहणी दौर्‍यावर
दरम्यान बागलाणमधील या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे शुक्रवारी (दि. १९) येणार असल्याची माहिती बागलाण तालुका शिवसेना प्रमुख सुभाष नंदन यांनी माध्यमांना दिली आहे.

- Advertisement -