विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला सपाटून मार खालल्यानंतर बड्या नेत्यांकडून ‘ईव्हीएम’वर संशय व्यक्त करण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या बाजूनं वातावरण असताना महायुतीला एवढ्या जागा मिळणे शक्यच नाही, असं म्हणत बड्या नेत्यांनी ‘ईव्हीएम’ला दोष देणे सुरू केले आहे. यातच भाजपच्याही एका बड्या नेत्याला ‘ईव्हीएम’वर भरोसा नाही का? असा प्रश्न पडला आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघात यंदा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्यात लढत झाली होती. पण, घासून झालेल्या लढतीत रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा 1243 मतांनी पराभव केला होता. शेवटच्या फेरीपर्यंत दोघांमध्ये रस्सीखेच सुरू होती. अखेर राम शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला.
हेही वाचा : ‘ते’ पराभव नाना पटोलेंच्या जिव्हारी; ठाकरे अन् ‘तुतारी’मुळे नुकसान झाल्याचं केलं मान्य
मात्र, एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ‘ईव्हीएम’बाबत शंका उपस्थित होत आहे. पण, राम शिंदे यांनी 17 मतदान केंद्रावरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी अर्ज दाखल केला आहे. यासाठी राम शिंदे यांनी प्रतिनिधीमार्फत 8 लाख 2 हजार 400 रूपये भरले आहेत.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ‘ईव्हीएम’वर संशय व्यक्त केल्यानं भाजपकडून टीकेचा भडीमार सुरू आहे. यातच राम शिंदे यांनी ‘ईव्हीएम’च्या पडताळणीची मागणी केल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.
हेही वाचा : एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद घ्यावं म्हणून भाजप आग्रही; मोठं कारण आलं समोर