जाणते राजे असणाऱ्या शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीत आपला जनाधार गमावला आहे. त्यामुळे त्यांनी राज्याचे आणखी वाटोळे न करता घरी बसावे, अशी टोकाची टीका भाजप नेते, राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.
अहिल्यानगर येथील लोणी येथे ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या यात्रेच्या नियोजनासाठी ग्रामस्थांसोबत विखे-पाटील यांनी बैठक घेतली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना विखे-पाटील यांनी शरद पवार यांना टार्गेट केलं.
हेही वाचा : कडूंनी म्हटलं, ‘माझा पराभव करण्याची त्यांची लायकी नाही’; नवनीत राणा डिवचत म्हणाल्या, “दादा आता कसं…”
“शरद पवार जाणते राजे आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपला जनाधार गमावला. त्यामुळे आता त्यांनी घरी बसावे. त्यांनी आतापर्यंत जनता आणि राज्याचे खूप वाटोळे केले. यापुढे त्यांनी ते करू नये,” असा हल्लाबोल विखे-पाटील यांनी केला आहे.
‘ईव्हीएम’ला दोष देणाऱ्या विरोधकांचाही विखे-पाटील यांनी समाचार घेतला आहे. “लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं होते. तर, सत्ताधारी महायुतीची पिछेहाट झाली होती. त्यावेळी कुणीही ‘ईव्हीएम’वर शंका उपस्थित केली नाही. ‘ईव्हीएम’वर विश्वास नाही म्हणून त्यांच्या खासदारांनी त्यावेळी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची गरज होती. तसेच, निवडणूक नाकारण्याचीही गरज होती. जनमत बाजूने असले की ‘ईव्हीएम’ चांगली आणि विरोधात गेले की वाईट, अशी विरोधकांची गत झाली आहे,” असा टोलाही विखे-पाटील यांनी लगावला आहे.
हेही वाचा : पहिल्यांदाच समोर आले शहाजीबापू, तीन नेत्यांना केलं टार्गेट; पराभवासाठी जिवलग मित्राला दिला दोष