‘सुरुवातीच्या काळात आम्ही अक्षम असू, थोडे कमी पडत असू. तेव्हा आम्हाला आरएसएसची गरज पडत होती. आज आम्ही मोठे झालो आहोत. सक्षम आहोत. त्यामुळे भाजप स्वत:चा कार्यभार स्वत: सांभाळते’, असे विधान करून काही महिन्यांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी संघाबरोबर वाद ओढावून घेतला होता. त्याची परिणती लोकसभा निवडणुकीत दिसून आली. या निवडणुकीत संघ प्रचारात सक्रिय दिसून आला नाही. इतकेच नव्हे तर, संघाची समन्वय बैठकदेखील संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान झाली नव्हती. लोकसभेत महाराष्ट्रात भाजपला चपराक मिळाल्यानंतर मात्र संघाने आपला राग बाजूला ठेऊन ‘राष्ट्रीय कर्तव्य’ म्हणून भाजपला पुन्हा आधार दिला. प्रारंभी हरयाणाच्या निवडणुकीत मोर्चेबांधणी करून भाजपला पराभवाच्या छायेतून बाहेर काढले. त्यानंतर संघाने महाराष्ट्राकडे लक्ष केंद्रित केले. यासाठी प्रथमत: भाजपसोबत समन्वय वाढविण्याचे प्रयत्न संघाकडून स्वत:हून करण्यात आले. त्यात प्रथमत: संघाच्या ज्येष्ठ नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनीच निवडणुकीची जबाबदारी स्वीकारावी, असा आग्रह धरला. त्यानंतर भाजपची कामे लोकांपर्यंत पोहचवण्यासाठीही संघाने पुढाकार घेतला.
दुसरीकडे संघाच्या विविध शाखांमध्ये हिंदुत्ववादी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष संदेश देण्यात आले. लोकसभा निवडणुकीत मुस्लीम मतांमुळे बसलेला फटका लक्षात घेत हिंदुत्वाचा मुद्दा ठळकपणे पुढे आणण्याची रणनीती संघाकडून आखण्यात आली. ही रणनीती भाजपच्या नेत्यांनीही स्वीकारली आणि त्याअंगाने प्रचार केला. याच काळात सरसंघचालक मोहन भागवत यांनी राज्यावर लक्ष केंद्रित करून आपल्या स्वयंसेवकांशी तसेच उमेदवारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. संघाच्या प्रत्येक जिल्ह्याचे पदाधिकारी सातत्याने बैठका घेऊन हिंदुत्वाच्या मुद्यावर मतदारांना अधिकाधिक संख्येने बाहेर कसे काढायचे याची मोर्चेबांधणी करत होते. प्रबोधन मंचच्या माध्यमातून हिंदुत्वाचा विचार घराघरापर्यंत पोहचवण्यात आला. त्यासाठी पत्रकेही वाटण्यात आली. एकूणच संघाने यंदाच्या विधानसभा निवडणुकीवर पकड निर्माण करून विजय खेचून आणलाच, शिवाय जे. पी. नड्डांसारख्या घमेंडी नेत्यालाही चपराक दिली.
संघाच्या सर्वच घटक शाखा सक्रिय
एकीकडे संघाच्या शाखांमधून स्वयंसेवकांमध्ये जागृतीसाठी ऊर्जा निर्माण केली जात होती, तर दुसरीकडे शाखेत नियमित न जाणार्या स्वयंसेवकांनाही ‘अॅक्टिव्ह’ करण्यात आले. त्याचप्रमाणे संघाच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जनजाती कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भारतीय विचार मंच, लोकजागर मंच, आयाम, लघुउद्योग भारती, स्वावलंबी भारत, संस्कार भारती, सेवा भारती, सहकार भारती, क्रीडा भारती, दुर्गा वाहिनी, भारतीय मजदूर संघ, भटके विमुक्त विकास परिषद यांना सोबत घेऊन संघाने प्रत्येक मतदारसंघ पिंजून काढला. थेट उमेदवाराचे नाव घेऊन प्रचार करण्यापेक्षा हिंदू धर्मासाठी मतदान करण्याचे आवाहन स्वयंसेवकांकडून करण्यात आले.
संघाने केलेले प्रयत्न
– भाजपच्या संघटनात्मक निर्णय प्रक्रियेत संघाने घेतला भाग
– शाखांमधून चेतवली ऊर्जा
– भाजपच्या वॉर रूमची स्वयंसेवकांनी घेतली जबाबदारी
– वायू वेग आणि विमर्शच्या माध्यमातून ‘ फेक नॅरेटिव्ह’ खोडून काढले
– सजग रहो अभियानातून करण्यात आले मतदानासाठी आवाहन
– प्रबोधन मंचच्या माध्यमातून जनजागृती
– शतप्रतिशत मतदान मोहिमेच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढवण्यात आली
– एक है तो सेफ है आणि बटेंगे तो कटेंगे या टॅग लाईनच्या माध्यमातून हिंदुत्ववादी मतदानाची मोट बांधण्यात आली
– कोपरा बैठका, संवाद बैठकांच्या माध्यमातून हिंदुत्ववादी विचार जनतेत रुजवण्यात आले.