घरताज्या घडामोडीNavratri 2021: यंदाही दांडिया आणि गरब्यावर निर्बंध, गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

Navratri 2021: यंदाही दांडिया आणि गरब्यावर निर्बंध, गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

Subscribe

सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबई वगळता नवरात्रोत्सवात राज्यभरात गरबा, दांडिया खेळण्यास परवानगी देणार असल्याची माहिती दिली असताना गृह विभागाने मात्र राज्यभर दांडिया आणि गरब्यावर निर्बंध घातले आहेत. गृह विभागाने सोमवारी घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर परिपत्रकाद्वारे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. गृह विभागाच्या सूचनेनुसार मंडळांना गरबा आणि दांडिया यांचे आयोजन यंदाही करता येणार नाही. या सुचनेमुळे गरबाप्रेमींचा हिरमोड झाला आहे.

देवीच्या मूर्तींची उंची सार्वजनिक मंडळांसाठी ४ फूट आणि घरगुती देवींच्या मूर्तींची उंची २ फूटांच्या मर्यादेत ठेवावी लागणार आहे. देवीच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढता येणार नाहीत. मंडपात एका वेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित राहू शकणार आहेत. आरती, भजन, किर्तन किंवा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे.

- Advertisement -

सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांनी महापालिका तसेच स्थानिक प्रशासनाची परवानगी घेऊनच काम करायचे आहे. घरात शक्यतो देवीच्या मूर्तीऐवजी घरातील धातू संगमरवराच्या आदी मूर्तींचे पूजन करावे. शाडू तसेच पर्यावरणपूरक मूर्तीचे विसर्जन शक्‍यतो घरच्या घरीच करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करावे. देवीच्या दर्शनाची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे गृह विभागाच्या परिपत्रकात म्हटले आहे.

दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून करावा. रावण दहनासाठी आवश्यक तेवढयाच व्यक्ती कार्यक्रमस्थळी हजर राहतील. प्रेक्षक बोलावू नयेत. त्यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून कार्यक्रम पाहण्याची संधी उपलब्ध करून  द्यावी, असे सूचनांमध्ये म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -