मुंबई : मुंबईत होणारी इंडियाची बैठक नाही तर ‘घमेंडिया’ची बैठक आहे. माजी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे ज्याला ‘गरूड झेप’ म्हणत आहेत ती गरुड झेप नाही तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्यासाठी त्यांच्यावर तुटून पडण्यासाठी तयार झालेली श्वापदांची टोळी आहे, अशा शब्दांत भाजपाने ठाकरे गटाच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबईत होणारी इंडियाची बैठक नाही तर ‘घमेंडिया’ची बैठक आहे. @uddhavthackeray ज्याला तुम्ही ‘गरूड झेप’ म्हणत आहात ती गरुड झेप नाही. मा. @narendramodi जी यांना बदनाम करण्यासाठी, त्यांच्यावर तुटून पडण्यासाठी तयार झालेली श्वापदांची टोळी आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) August 31, 2023
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकात ‘‘इंडिया’ची गरुडझेप! भयमुक्त भारत’ या शीर्षकाखाली लिहिलेल्या अग्रलेखातून विरोधकांच्या इंडिया आघाडीचा उल्लेख करत मोदी सरकारवर टीका केली आहे. देशात कायद्याचे राज्य नाही. मणिपूर, जम्मू-कश्मीर, महाराष्ट्रात लोकशाही नाही. न्यायालयास प्रतिष्ठा नाही व केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून भयाचे साम्राज्य उभे केले गेले आहे. देशातील हे भयाचे साम्राज्य उलथवून टाकण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीची पाऊले मजबुतीने पडत आहेत. राज्यांचा स्वाभिमान, प्रांतांची अस्मिता, सर्वच धर्मांचा मान राखून एक व्यक्ती व त्यांचे धनिक मित्रमंडळ नव्हे, तर भारत देश शक्तिमान व्हावा यासाठी ‘इंडिया’चा गरुड पक्षी झेपावला आहे, असे या अग्रलेखात म्हटले आहे.
हेही वाचा – मुंबईतील बैठकीचा ‘तो’च संदेश, ठाकरे गटाचा इंडिया आघाडीवरून मोदी सरकारला इशारा
त्याला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईत होणारी इंडियाची बैठक नाही तर ‘घमेंडिया’ची बैठक आहे. उद्धव ठाकरे ज्याला ‘गरूड झेप’ म्हणत आहेत ती गरुड झेप नाही, पंतप्रधान मोदी यांना बदनाम करण्यासाठी, त्यांच्यावर तुटून पडण्यासाठी तयार झालेली श्वापदांची टोळी आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना तुमच्या याच टोळीने शंभर कोटी वसुली केली, कोरोना काळात कोट्यवधींची कंत्राटे घशात घातली. मृतदेहांसाठीच्या बॅगही त्यांच्या नजरेतून सुटल्या नाहीत. तुम्ही लालूप्रसाद यादवांच्या माध्यमातून मोदी यांच्या ‘नरड्यावर बसण्याचे स्वप्न’ बघा. पण जनता तुमच्या छाताडावर बसेल. तुम्ही मोदी यांना जेवढ्या शिव्या द्याल जनता पंतप्रधान मोदी यांच्यावर तेवढे जास्त प्रेम करेल, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा – Narendra Modi तिसऱ्यांदा होणार पंतप्रधान? परदेशातील भारतीयांना विश्वास, सर्वेक्षणावर भाजपा खूश
महात्मा गांधीजींनी ‘QUIT INDIA’चा नारा याच मुंबईतून दिला होता. त्यांच्या नाऱ्यामुळे इंग्रजांना देशातून जावे लागले. आता पुन्हा एकदा तोच ‘QUIT INDIA’चा नारा देऊन तुमच्यासारख्या भ्रष्ट प्रवृत्तींना जनता कायमचं घरी बसवणार आहे. नरेंद्र मोदी यांचा तुमच्या (I.N.D.I.A.) विरोधातील संघर्ष हा स्वतःचे कुटुंब वाचवण्यासाठी नाही तर, देश वाचविण्यासाठी आहे. तुम्ही तुमचा ‘परिवार बचाव’ अजेंडा घेऊन बैठका करा. कोट्यवधी देशवासीयांच्या स्वप्नपूर्तीचा अजेंडा घेऊन पंतप्रधान मोदी यांचे देशसेवेचे कार्य अखंड सुरू राहणार आहे, असेही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.